मुंबई - धरणातून पाण्याचा विक्रमी विसर्ग झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी मदतकार्य राबवण्यात येत आहे. मात्र, आता मदतीचे निकष बदलवून वाढीप दुप्पत मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून योग्य वेळी पूरग्रस्त भागाला भेट देईन, असेही ते यावेळी म्हणाले. राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1007 मिमी असून आतापर्यंत सरासरीच्या 685 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पूरपरिस्थिती आणि मदत कार्याची माहिती घेतली. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कोल्हा'पूर' -
कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून विमानाच्या माध्यमातून पूरग्रस्तभागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूरमधील 204 गावांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या 11 हजार नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत असल्याचे सांगितले.
सांगली पूरस्थिती -
सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस, वाळवा तालुक्यात पुराचा फटका बसला आहे. सुमारे 53 हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील सुमारे 2 हजार नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पुणे पूरस्थिती -
पुणे जिल्ह्यात शहरासह 64 गावे पुराने प्रभावित झाली असून सुमारे 3 हजार 343 लोकांना मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत.
रायगड पूरस्थिती -
रायगड जिल्ह्यात 8 तालुके बाधीत असून सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला आहे. सुमारे 3 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिलह्यातील 38 धरणे 100 टक्के भरली आहेत. पुरामुळे 13 गावे बाधीत झाली आहेत.
नाशिक, ठाणे पूरस्थिती -
नाशिक जिल्ह्यात गेल्या 50 वर्षांतला सर्वाधिक विसर्ग सोडण्यात आला असून सर्व धरण 80 टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात 13 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या दोन्ही ठिकाणची पूरस्थिती सध्या नियंत्रणात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पूरग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश -
राज्यात पूर ओसरलेल्या भागात पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पूरग्रस्त भागात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिकाअधिक उपाययोजना कराव्यात. तसेच गरज भासल्यास मुंबई येथून वैद्यकीय पथक देखील पाठवण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर ओसरल्यानंतर त्या भागात वीज पुरवठा तातडीने पुर्ववत होणे गरजेचे आहे. त्यासाठी अतिरीक्त पथके तैनात करण्याचे निर्देश ऊर्जा विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातपूरग्रस्त भागात आरोग्य सुविधेसाठी सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत असून आवश्यकता भासल्यास अधिकची पथके पाठविण्यात येतील. औषधांचा साठा पुरेसा असून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत रेल्वेप्रशासनाला माहिती द्या - मुख्यमंत्री
धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग याबाबत माहिती देण्यात यावी. त्यामुळे त्या भागातील रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी मदत होईल, असे मागणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मांडली होती. त्यानुसार त्यांना सर्व माहिती देण्यात यावी, असे निर्देश आज मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.