मुंबई - पावसात भिजावे लागते. आमचा अनुभव थोडा कमी पडला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. राज्यात निवडणुकीच्या काळात एकत्र येताना, आम्ही सत्ता स्थापन करताना कधीही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद राहील, असा कोणताही विषय ठरला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे देण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा बंगल्यावर दिले.
दिपावलीच्या निमित्ताने आज वर्षा बंगल्यावर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी आम्ही सेनेसोबत एकत्र येऊन सरकार बनवणार आहोत. मुख्यमंत्री भाजपचाच बनेल असेही स्पष्ट केले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सत्ता स्थापन करण्यासाठी आमचा फॉर्म्युला काय आहे, हे लवकरच कळेल. शिवसेना आणि आम्ही चर्चेला बसल्यानंतर आम्ही मेरिटवर बसून पदे देऊ. सरकार कधी स्थापन होईल, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही मुहूर्त काढला नाही. मात्र, लवकर माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - ...अखेर कुटुंबीयांच्या आदोलनानंतर अधिकारी निलंबीत, डीसीपी सौरभ त्रिपाठींचे आदेश
'सामना' मध्ये ज्या प्रकारे लिहिले जात आहे, त्यावर आमची नाराजी आहे. वृत्तपत्र आहे म्हणून काहीही लिहीत राहणे योग्य नाही. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लिहून दाखवावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सेनेचे नेते संजय राऊत यांना आम्ही भाव देत नाही. मात्र, सोबत निवडून येऊन असे विधान करणे लोकांना आवडत नाही. आदित्य ठाकरे काय बनणार आहेत? त्यांच्या पक्षाने बनवावे. आम्हाला सेनेकडून प्रस्ताव आला होता. मात्र, आमच्या अमित शाह यांनी स्पष्टपणे भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - 'अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा विषय कधीच ठरला नव्हता.. त्यांना तर पाच वर्षे हवे असेही वाटेल'
माझ्याकडे 10 अपक्ष लोकांचा पाठिंबा आला असून आणखी 15 जणांचा येईल, असे वाटते. राज्यात आम्हाला चांगला जनादेश मिळाला आहे. आम्ही लवकरच सरकार स्थापन करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.