मुंबई Eknath Shinde On Milind Deora : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी (14 जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर त्यांनी या प्रसंगी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली आहे.
दीड वर्षांपूर्वी मीसुद्धा असंच ऑपरेशन केलं : याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी मिलिंद देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. ते सपत्नीक आले आहेत म्हणून वहिनींचंही स्वागत करतो. कारण कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषाच्या मागं महिलेची ताकद असते. आपल्या मनात ज्या भावना आहेत दीड वर्षांपूर्वी माझ्या मनातही त्याच भावना होत्या. कुठलाही निर्णय घेताना त्याचे चांगले, वाईट परिणाम होतात. परंतु तो निर्णय घेताना धाडस करावं लागतं आणि असे निर्णय घ्यावेच लागतात.' शिंदे पुढे सांगतात, 'मी जेव्हा हा (बंड) निर्णय घेतला तेव्हा श्रीकांतच्या आईला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला होता. कारण आपणाला माहिती आहे, शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातील माणसाला काही गोष्टी असतात त्या उघडपणे सांगता येत नाहीत. काही ऑपरेशन असे असतात की, त्यामध्ये सुईपण टोचता कामा नये. कारण मी डॉक्टर नाही. तरीसुद्धा मी दीड वर्षांपूर्वी ऑपरेशन केलं आणि कुठे टाकाही लागला नाही.'
आजचा प्रवेश हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है : शिंदे पुढे म्हणाले, गेली ५० - ५५ वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाळ जुळली होती. या राज्यासाठी देशासाठी मुरली देवरा यांचही योगदान आहे. आपण खासदारही होतात आणि मंत्री सुद्धा होता. मी निर्णय घेताना सुद्धा नगर विकास खात्याचा मंत्री होतो. तसं आपल्या दोघांमध्ये बरच साम्य आहे. काही लोक अशी असतात की, ती पुन्हा होत नाहीत. ती स्वतःसाठी न जगता समाजासाठी, दुसऱ्यासाठी, देशासाठी जगत असतात. त्यामध्ये एक बाळासाहेब ठाकरे आणि मुरली भाई सुद्धा होते. तुम्ही वयाच्या २७ व्या वर्षी खासदार झालात. तुम्ही उच्चशिक्षित आहात. या राज्यासाठी देशासाठी काय करता येईल हे व्हिजन तुमच्यासमोर आहे. अशा लोकांची समाजाला गरज आहे. एक सुसंस्कृत अभ्यासू नेता अशी आपली ओळख आहे. आजचा प्रवेशा हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आरोप - प्रत्यारोपाच्या भानगडीत न पडता आपलं काम करत राहायचं हे तुम्हालाही माहित आहे. मी सुद्धा हेच करतो. मी क्लीन ड्राईव्हला गेल्यानंतर आमदार, खासदार, आयुक्त चहल हे सुद्धा हातामध्ये झाडू घेऊन मुंबई स्वच्छ करू लागले आहेत. मुंबईतील पोल्युशन पोलुशन ३५० वरून ६०-७० वर आले आहे. आपल्या राज्याला स्वच्छतेमध्ये देशात पहिला क्रमांक भेटला.
दीड वर्षांमध्ये एकही सुट्टी घेतली नाही : शिंदे पुढे म्हणाले, काही लोक कल्याण लोकसभेत गेले होते. आता ते म्हणाले रोड सफाई धुलाई चालू आहे. आता निवडणुकीमध्ये यांना साफ करा. लोक रस्त्यावर उतरणारे आहेत त्यांना कसं साफ करतील. मी दीड वर्षांमध्ये एकही सुट्टी घेतली नाही. मी गावी गेलो तरी सुद्धा तिथे जनता दरबार घेतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. ते म्हणतात असा शेतकरी कधी बघितला आहे का? की हेलिकॉप्टरने जातो शेती करतो. पण मी फोटोग्राफी करत नाही. अनेक जण हेलिकॉप्टरने जाऊन फोटोग्राफी करतात पण मी जास्त काही बोलत नाही. जेवढे आमच्याबद्दल बोलतील. आमच्यावर आरोप करतील तेवढे ते खड्ड्यात जातील. डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मी दररोज एक लाखापेक्षा अधिक लोकांना भेटतो याचा परिणाम फार चांगला होतो. इतरांची साफसफाई आम्ही निवडणुकीमध्ये करणारच आहोत. आता गरज आहे मुंबईच्या विकासाची. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे. मी मुंबई पालिका आयुक्त यांना सांगितलं की, दरवर्षी रस्त्यात इतके खड्डे कसे पडतात. तुमच्याकडे पैसे नाही आहेत का? ते बोलायला घाबरत होते. १० वर्षात साडेचार हजार कोटी रस्त्याच्या रिपेरिंगमध्ये खर्च झाले. आम्ही ठरवलं पुढच्या दोन अडीच वर्षात मुंबईत सर्व रस्ते काँक्रिटचे करायचे आहेत आणि मुंबई खड्डे मुक्त होणार.
काहीजणांची पोटदुखी वाढली आहे, त्यांनाही गोळ्या द्या : मुंबई आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला आहे. १४७ प्रकारच्या टेस्ट मोफत करण्यात येत आहेत. आमचं काम बघून काही लोकांची पोट दुखी वाढू लागली आहे. मी डॉक्टरांना सांगितलं त्यांनाही गोळ्या इंजेक्शन देत जा, असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच मुंबई देशात नाही तर जगात एक नंबरची करायची आहे. जी २० परिषद अध्यक्षपद आपणाला भेटले ही फार गौरवाची गोष्ट आहे. मुंबई रात्रदिवस चालणारी आहे. मुंबई कधी थकत नाही थांबत नाही. मुंबईत कधी कोणी उपाशी झोपत नाही. ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय मोदी यांनी सुरू ठेवला आहे. काही लोकांनी सांगितलं गरिबी हटाव पण गरिबी हटली नाही. परंतु गरीब हटला. मोदी सर्वांसाठी काम करतात. सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हा त्यांचा संकल्प आहे. मुंबई, महाराष्ट्रातील कुठल्याही प्रोजेक्टसाठी मोदी लगेच पैसे देतात. परंतु ते जेव्हा येथे येतात तेव्हा इतर लोक बेचैन होतात. पण आम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो. महाराष्ट्र मुंबईमध्ये उद्योगासाठी भरपूर वाव. राज्याचे आणि केंद्राचे संबंध चांगले असल्याकारणानं परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे. तुम्ही शिवसेनेत आलात तुमचं मी स्वागत केलं आहे. लोकांशी संवाद साधण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये बसून हे तुम्ही करू शकत नाही. म्हणून तुम्हाला फिल्डवर काम करावे लागेल. तुमच्याबरोबर आलेले अनेक माजी नगरसेवक, उद्योजक, व्यापारी या सर्वांचे पक्षात स्वागत करतो. हे सर्व लक्ष्मीपुत्र आहेत. तुम्ही सर्व भंडार घेऊन आला आहात. मेहनत करायला आपण मागे नाही, ती भरपूर करूया. या सर्वांच्या नेटवर्कचा उपयोग समाजाच्या हितासाठी करूया. मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण फक्त राज्याच्या विकासासाठी खर्च करायचा आहे. आपणाला सकारात्मक काम करायचं आहे, असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा -
- मिलिंद देवरांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; खासदारकी लढवण्याचे दिले संकेत
- घराणेशाहीची व्याख्या उद्धव ठाकरेंनी सांगावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा, स्वच्छता मोहिमेची सुरुवात
- 27व्या वर्षी खासदार झालेले मिलिंद देवरा काँग्रेसला सोडून आज शिंदे गटात करणार प्रवेश, कसा राहिला राजकीय प्रवास?