मुंबई CM Eknath Shinde On Viral Video : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सह्याद्री अतिगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल होत होते. तेव्हा त्यांच्यात 'आपल्याला बोलून, मोकळं होवून निघून जायचंय', असं संभाषण झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माईक चालू असल्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा केलाय.
व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल : हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. यावरून विरोधकांकडून सरकारवर टिका केली गेलीय. शरद पवार गटाकडून आणि काँग्रेसकडून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना समस्यांना उत्तर द्यायचं नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारं सरकार राज्याचा कारभार हाकत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'एक्स' या सोशल मीडिया माध्यमातून केला होता.
सर्वपक्षीय बैठकीत साधकबाधक चर्चा : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भांमध्ये सर्वपक्षीय बैठकीत साधकबाधक चर्चा झालीय. राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. पुरोगामी विचाराचं आपलं राज्य आहे. सर्व जाती-धर्माचे लोकं गुण्या गोविंदानं राहत आहेत. राज्याच्या दृष्टीनं हे हिताचं आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया : सर्वपक्षीय बैठकीनंतर आम्ही पत्रकार परिषदेसाठी तिघे बोलत येत होतो. ज्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झालीय. आपण त्या मुद्द्यावरच बोलू या आणि आज कुठलेही राजकीय प्रश्न उत्तरे नको, अशा प्रकारची आमची चर्चा चालू होती. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत चर्चा घडली. यावर बोलूया आणि आपण निघू या, अशा प्रकारचं आमचं संभाषण होतं. मात्र याचा गैर अर्थ काढला गेलाय. तसंच काही लोकांनी मागचे पुढचे शब्द काढून, तेवढाच भाग (Shinde On Viral Video Before press conference) दाखवला. खोडसाळपणानं हे केलं गेलंय.
अपप्रचार आणि दिशाभूल करण्याच्या प्रयत्न : मराठा समाज आणि सरकारमध्ये दुही पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. परंतु मराठा समाजानं कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका सरकारनं घेतलीय. अपप्रचार आणि दिशाभूल करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांनीही कायदा सुव्यवस्था आणि शांततेबाबत कोणताही खोडसाळपणा करू नये, अशा प्रकारचं विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलंय.
हेही वाचा :
- Maratha Protest Jalna: अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार मनोज जरांगेची भेट! शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची फसवणूक- अतुल लोंढेंचा आरोप
- Sanjay Raut On Devendra Fadnavis : 'आमचं ठरलय दबावापुढे झुकायचं नाही'; 'इंडिया'च्या बैठकीवर राऊत यांची प्रतिक्रिया
- CM Eknath Shinde on Maratha Reservation : सरकार घाईगडबडीत निर्णय...; मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं