मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारने रचले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मविआचे षडयंत्र: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या आरोपात अडकवून जेलमध्ये टाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचले होते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
मी हे होऊ दिले नाही: मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, इतकेच नाही तर हे षडयंत्र त्यांनी जरी रचले असले तरी मी महाविकास आघाडी सरकारचा भाग होतो. पण मी काही मुख्यमंत्री वा गृहमंत्री नव्हतो. मात्र, मी हे होऊ दिले नाही, असेही ते ठामपणे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते व त्यांच्या समोरच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हे आरोप केले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे गौप्यस्फोट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणावरून उठवले व त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांना इतकी कसली घाई झाली होती. अभिनेत्री केतकी चितळे, आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांना आतमध्ये घाला, असे सांगण्यात आले, हे सर्व मला माहीत आहे, असे अनेक गौप्यस्फोट त्यांनी केले. एक प्रकारे महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांचा द्वेषच करत होती, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
जाहिरातींच्या टीकेवरून पलटवार: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजित पवार म्हणतात जाहिरातीसाठी ५० कोटी खर्च केले. २४५ कोटींचे जाहिरातीसाठी नियोजन अजित पवार यांनीच त्यांच्या काळात केले होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या जाहिरातीवर किती कोटी खर्च केले गेले? असा प्रश्न उपस्थित करत, अरे महाराष्ट्र आपला आहे. ७ महिन्यात ५० कोटी खर्च केले त्यात वाईट वाटून घेण्याचे कारण काय? आम्ही काम करत आहोत. जनतेसाठी विविध योजना आणत आहोत. तर त्याची माहिती, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजेत, असेही शिंदे म्हणाले.
सिंचन घोटाळ्याचे काय झाले?: मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गेले अडीच वर्ष बंद होते. आता सुरू झाले तर जनतेला चहा तरी देऊ शकतो ना? हा चहा सुद्धा तुम्ही काढता? तुम्ही ७० हजार कोटी सिंचन घोटाळ्यात पाण्यात घातले. त्याचे काय झाले, त्याचा हिशोब ही द्यावा लागणार? असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे पवार यांना आव्हान दिले आहे.
दिल्ली पुढे थोडे वाकावे लागते!: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे वारंवार दिल्ली वाऱ्या करत असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावरून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही झाले तर केंद्र जबाबदार, मग आपली जबाबदारी काय आहे. आम्ही सातत्याने पाठ पुरावा करतो. मला दिल्लीत घर घ्यायची गरज नाही. श्रीकांत शिंदे यांचे दिल्लीत घर आहे. तुमचे सरकार असताना तुम्ही कडक सिंग बनले होते, मग तुम्हाला केंद्राकडून पैसे भेटणार कसे? प्रधानमंत्री एका महिन्यात २ वेळा मुंबईत येऊन गेले. यामुळे कडक राहून चालत नाही थोडे वाकावे लागते, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
सफाई कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय: आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सफाई कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ते म्हणाले की, सफाई कामगारांना वारीस पद्धत लागू करत आहोत. सर्व प्रकारचे सफाई कामगार यांचा यामध्ये समावेश आहे. ते मुदत पूर्व किंवा नंतर निवृत्त झाले तरी त्याच्या कुटुंबातील कुणालाही नोकरीवर ठेवता येईल. यांना वेळेत जर नोकरी दिली नाही तर नियुक्ती प्राधिकारीवर कारवाई केली जाईल. पदभरतीचे कुठलेही नियम यांना लागू होणार नसून कायम घरे देण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे.