मुंबई - आमचे थोर नेते अरुण जेटली यांची बातमी ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या जाण्याने मी व्यथित असून मला तीव्र दु:ख झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एक संघर्षशील नेतृत्त्व आपल्यातून कायमचे हिरावून घेतले आहे. अरुण जेटलींचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि कोट्यवधी भाजप कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अवघ्या १५ दिवसातच नियतीने आमचे २ उमदे नेते हिरावून घेतले आहेत. अगदी काल-परवाच सुषमाजी आमच्यातून निघून गेल्या आणि आज अरुण जेटली. त्यांच्या जाण्याने दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एक उमदा विद्यार्थी नेता, आणीबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम आणि निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्त्व आपल्यातून कायमचे निघून गेले आहे. प्रकृती प्रतिकूल असतानाही पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले पाहिले आहे. प्रकृती साथ देत नसतानाही अलिकडच्या काळात भाजपच्या प्रत्येक बैठकांमध्ये त्यांना उपस्थित राहताना पाहिले आहे. त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो.