मुंबई - ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने इतिहासाचे जतन करणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. गोरक्षकर हे इतिहास, कला, पुरातत्व आणि वस्तुंच्या जतनाशी संबंधित शास्त्राचे एक महत्त्वाचे अभ्यासक होते. ऐतिहासिक वस्तूंच्या जतनासाठी त्यांनी कृतीशील प्रयत्न केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
सदाशिवराव गोरक्षकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. शनिवारी सकाळी वासिंदजवळील भातसई निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) सहायक अभिरक्षक म्हणून 1964 मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. संग्रहालयशास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरुख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत.
वस्तुसंग्रहालयाशी संबंधित विषयावरील त्यांचा अधिकार मोठा होता. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या समृद्ध इतिहासाची ओळख नव्या पिढीला करुन दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.