मुंबई - राज्यातील जनतेनी आम्हाला मागील ५ वर्षात अव्याहतपणे सेवा करण्याची संधी दिली आम्ही ती पुढेही सेवा करू. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विकासाची त्रिसूत्री दिली आहे. त्याच त्रिसूत्री वर आधारित राज्यातील जनतेचा विकास करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिले. तसेच पाच वर्षात सरकारने सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, असे प्रयत्न केले असल्याचेही ते म्हणाले.
७३ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुजरातहून आलेल्या पोलीस दलाच्या तुकडीसह बृहन्मुंबई पोलीस आणि आरपीएफच्या दलाने यावेळी मानवंदना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर आपले सरकार गंभीर असून ज्यांचे नुकसान झालेले आहेत, त्यांचा विकास आणि त्यांचे पुनर्वसन अत्यंत वेगाने करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही केंद्राला ६ हजार ८०० कोटींचे पॅकेज मागितले आहे, त्यातून आम्हाला संकटात सापडलेल्या जनतेचा विकास करायचा आहे.
पूरग्रस्तांचे पुनर्वसन वेळेत करू, त्यासाठी कोणतीही दिरंगाई केली जाणार नाही. ज्याची घरे, शेती उध्वस्त झाली आहेत. आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. मात्र, या दरम्यान आलेले संकट आणि या काळात आमच्या पाठीशी जनता उभी राहिली, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो असेही ते म्हणाले.
आमचा संकल्प हा आपले राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा असून ते आम्ही करणार आहोत. यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला आणायचे आहे. ते मराठवाडा, विदर्भातील नद्यांकडे वळवयाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भाग आम्ही दुष्काळ मुक्त करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मागील पाच वर्षात राज्याला विविध क्षेत्रात अग्रेसर करू शकलो
आर्थिदृष्ट्या राज्याला आम्ही भक्कम केले, उद्योग, अर्थव्यवस्था भक्कम केली. शिक्षणाच्या क्षेत्रात विकास केला तो पुढेही करायचा आहे. राज्यातील वंचित, उपेक्षित असलेल्या समाजासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास पोहोचला पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या त्रिसूत्रीवर आम्ही चालत आहोत. त्यामुळे आम्ही राज्यात गरिबांपर्यंत विकास घेऊन जाऊ शकलो, असेही ते म्हणाले. देशाच्या आर्थिक थ्री ट्रिलियन व्यवस्थेत आमचा सर्वात मोठा वाटा असेल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची आम्ही पुढेही सेवा करू असे आश्वासन दिले.
आजचा स्वातंत्र्य दिन अनोखा
आजचा स्वातंत्र्य दिन हा अनोखा असा हा स्वातंत्र्य आहे. आज अत्यंत शांततेत, काश्मीर, लढाख येथे आज तिरंगा फडकवला गेला. याचे सर्व श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
संसार उभे करण्याचे आव्हान
राज्यात सांगली, कोल्हापूर आदी भागात जी पूरस्थिती तयार झाली. त्यात सरकारने आणि इतर सर्व यंत्रणांनी प्रचंड परिश्रम करू लोकांना सुरक्षित स्थळी नेले त्यांचे प्राण वाचवले. आता आपल्यासमोर खरे आव्हान आहे, ज्याचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांना उभे करण्याचे काम सरकारला करावे लागेल आणि आम्ही ते अत्यंत वेगाने करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.