नवी दिल्ली - राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र अजूनही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या भांडणामुळे हे सत्ता स्थापना आणखीनच लांबणीवर जात आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही आज दिल्लीत गेले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा तर होणारच यात शंका नाही. तर दुसरीकडे शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेले आहेत.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच अमित शाह यांची भेट घेत आहेत. अर्धा काळ मुख्यमंत्री शिवसेनेचा या मागणीवरुन शिवसेना अडून बसली आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, अशी भुमिका शिवसेनेने घेतल्यामुळे भाजप कोंडीत सापडला आहे. तर दुसरीकडे भाजप शिवसेना एकमेकांबरोबर भांडत असताना शरद पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का? या प्रश्नाचे उत्तरही लवकरच मिळणार आहे.
भाजप १०५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. मात्र, सत्ता स्थापनेवरुन दोघांमध्ये भांडण सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युल्या नुसार अडीच अडीच वर्ष दोघांचा मुख्यमंत्री करण्यास भाजप राजी नाही, तर शिवसेनाही आपला मुख्यमंत्री पद मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, शरद पवारांच्या दिल्ली भेटीत आणखी कोणती राजकीय समीकरणे पुढे येतात हे याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पवार आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर कोणती नवी समीकरणे जुळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका हे आज समजण्याची शक्यता आहे.