मुंबई : केंद्र आणि राज्य शासन महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यात येत आहे. महिलांना रोजगाराची संधी देखील यातून मिळत आहे. उद्योजिका बनण्याचे महिलांचे स्वप्न यातून पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. आतापर्यंत केवळ 25 टक्के सबसीडी महिलांना दिली जात होती. योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्यास हाती काहीच मिळत नव्हते. आता राज्य शासनाने महिलांसाठी क्लस्टर प्रोजेक्ट उपक्रम हाती घेतला आहे. महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन, चांगल्या पद्धतीने उत्पन्न व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. त्यानुसार महिलांना चार प्रकारच्या मशीन देऊन; त्यातून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील, असे आशा मामेडी यांनी सांगितले.
दुबई, तुर्की सोबत करार : कोरोनानंतर महिलांना रोजगाराची मोठी गरज आहे. राज्य शासनाने ही बाब लक्षात घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मासोळी विक्री, कपडे विक्री, कपड्यांची शिलाईचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांसाठी छोटे - छोटे उद्योग करता यावेत, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर करार करण्यात येत आहेत. नुकताच दुबई, तुर्की सोबत करार झाला. येथे कॉटनच्या कपड्यांचे मोठे मार्केट आहे. येथून कपडे मुंबईत आणून महिलांना विक्रीसाठी दिले जातील.
मासोळी प्रोजेक्ट राबवणार : मुंबईला समुद्राने वेढलेला आहे. कोळी बांधवांच्या मुंबईत मोठ्या प्रमाणात मासोळी विक्री होते. कोळी महिलांना साफ, स्वच्छ मासळी देता येईल, अशा स्वरुपाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मुंबईतील कोळी बांधव महिलांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महिलांकडून मागवले अर्ज : रोजगार मिळाल्यास महिला सक्षम होतील. त्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणात महिलांकडून अर्ज मागवले जात आहेत. मुंबईतील महिलांनी, बचत गटांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात अर्ज द्यावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ही मामेडी यांनी केले आहे. महिलांसाठी नवीन नवीन कल्पना राबवत असून, या संकल्पनेतून चांगल्या गोष्टी करायचा आमचा प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या.
पिंक टॉयलेट, फिडींग रुम : महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, राज्यभरात महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नाहीत. आजवर अनेक मोठ- मोठ्या घोषणा झाल्या. परंतु, अमलबजावणी झालेली नाही. महिलांची यामुळे कुंचबना होत आहे. शिंदे सरकार सत्तेवर येताच, महिलांसाठी पिंक टॉयटेल, फिडींग रुम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या दोन्ही योजना राबवल्या जातील, अशी माहिती मामेडी यांनी दिली.