मुंबई - महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना कोरोना विषाणूचा प्रासार होत असताना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. जोखीम भत्ता, विमा संरक्षण दिले जात नाही, ते कंत्राटी कर्मचाऱ्यांना द्यावे, या मागणीसाठी कंत्राटी सफाई कामगारांनी पालिका मुख्यालयाखाली आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेमार्फत हे आंदोलन करण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या रिक्त जागा न भरता ही कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेतली जात आहेत. पालिकेच्या सफाई कामगारांना ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्या सोयी सुविधा कंत्राटदाराकडून कंत्राटी सफाई कामगारांना दिल्या जात नाहीत. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी पीपीई किट्स, मास्क दिले जात नाहीत. जोखीम भत्ता दिला जात नाही. केंद्र सरकार नियमावलीनुसार विमा सुद्धा काढला जात नाही. त्यामुळे कंत्राटी सफाई कर्मचारी नाराज आहेत.
कंत्राटी सफाई कामगारांना कोरोनापासून वाचण्यासाठी सोयी सुविधा व सुरक्षा साधने देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, त्यावर प्रशासन गंभीर नसल्याने आज कंत्राटी सफाई कामगारांनी पालिका मुख्यालयाजवळ कचऱ्याच्या गाड्या आणून आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असून प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेट घडवून देण्यात आली आहे.