मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (एमएससीई) घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 23 मे 2019 रोजी होणार होती. मात्र वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काळात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती, राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.
राज्य परीक्षा परिषदेला पत्र
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्तीची परीक्षा रद्द करण्याची मागणी पालक व शिक्षकांकडून होत होती. याची दखल घेत राज्य परीक्षा परिषदेकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला परीक्षा पुढे ढकलण्यात संदर्भात 5 मे 2021 रोजी पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये परिषदेने विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेची तयारी केली आहे. परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होईल. याशिवाय गुणवत्ता यादीत येण्याची त्यांची संधी कायमस्वरूपी डावलले जाईल. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याऐवजी ती पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षण विभागाला केली होती.
'परिक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार'
देशात आलेल्या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमुळे पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबरोबरच जेईई, नीट, सीए, सीएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच आज (शुक्रवार) भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनने यांनी सुद्धा महाराष्ट्र्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून राज्यातील कोरोनाचे संक्रमण पाहता 23 मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केली होती. या सर्वांची मागणी लक्षात घेता येत्या 23 मे रोजी 2021 रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिलेली आहे. भविष्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -मुंबईत दररोज ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय मजूर होत आहेत दाखल