मुंबई - उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ३ कोटी ४१ लाख ९८ हजार ५९७ चा धनादेश आज (रविवारी) सुपूर्द केला.
न्यायमूर्ती काय म्हणाले?
राज्य सरकार करीत असलेल्या कोरोनाच्या लढाईत न्यायालयाच्या सामजिक जबाबदारीचा हा भाग आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायाधीश तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे यात योगदान आहे, असे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी म्हटले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन -
कोरोनाचा कहर वाढल्यानंतर आपल्याला पारतंत्र्यात जावे लागले. गेल्या काही महिन्यांपासून ते अनुभवत आहोत. अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या लोक चळवळीमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोरोनापासून मी माझा देश, राज्य मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार, असा निश्चय करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले.
हेही वाचा - #IndiaAt75 : पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!, वाचा एका क्लिकवर