मुंबई - धारावीत झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावी हा मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. धारावीत राहणारे स्थलांतरीत कामगार, चाकरमानी आपल्या-आपल्या गावाची वाट धरत आहेत. कोणी चालत तर, कोणी खासगी वाहनाने, श्रमिक ट्रेनने आपआपल्या गावी गेले आहेत. तर काही अजूनही जात आहेत. मात्र, ज्यांना गावी जायला मिळत नाही ते आपले शेजारीपाजारी गावी गेल्याने, वस्तीतल्या गल्ल्या रिकाम्या होत चालल्याने अस्वस्थ होत आहेत.
धारावी कुंभारवाडा येथे मटण गल्लीत राहणारे बाबू टेंबे यांचे मूळ कोकणातील कुटुंब आहे. ते आपल्या लहान मुलींसह येथे सध्या राहत आहेत. मात्र, ते भीतीच्या वातावरणात जगत आहेत. धारावीसारख्या या छोट्या वस्तीत राहणं कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या शेजारी असलेले काही कुटुंबानी चालत, मिळेल त्या मार्गाने गावं गाठली आहेत. एका गल्लीत 25 घरातील सध्या 3 ते 4 घरच आता उघडी आहेत. बाकी सर्व आपल्या मायदेशी गेले आहेत. त्यामुळे शांत गल्ली त्यांना खायला उठत आहे.
गल्लीतील बाकी लोकांनी सुरुवातीलाच लॉकडाऊनपासून प्रयत्न सुरू केले होते. त्यांना कशीबशी संधी मिळाली. पण टेंबे यांनी गावी जाणे पहिल्यांदा जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. पण आता गल्ली सुनी-सुनी झाल्यानंतर त्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. आपणही अगोदरच गावी जायचा प्रयत्न केला असता तर बरे झाले असते, असे टेंबे यांच्या पत्नी वंदना यांनी सांगितले.
टेंबे गावाला जायला मिळेल म्हणून, रोज काहींना काही प्रयत्न करत आहेत. टेंबे गावी जाण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून ऑनलाईन ई-पाससाठी खूप प्रयत्न करत आहेत. परंतू, त्यांना काही पास मिळत नाही. कोणीतरी सोडेल म्हणून खासगी वाहनं देखील शोधतात. परंतू, तेही त्यांना मिळत नाही. चालत जायच म्हटलं तर 2 लहान मुली त्यांना आहेत. त्यामुळे त्यांना चालतही जाता येत नाही. एसटी महामंडळात, स्थानिक पोलीस ठाण्यातही ते परवानगीसाठी चक्कर मारून आले. मात्र, काही उपयोग झाला नाही. गेल्या महिनाभरापासून ते आपलं सामान भरून गावी जाण्याचा तयारीत आहेत. रोज सकाळी उठतात रात्रीपर्यंत गावी जाण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. पण गावी जाण्याचा मार्ग त्यांना काही सापडत नाही.
बाबू टेंबे यांचे कुटुंब गेल्या 40 वर्षांपासून धारावीत राहात आहे. त्यांचे आजोबा पणजोबा देखील मुंबईत होते. त्यांनी अनेक संकटं या मुंबईत पाहिली पण कधीही गावी जाण्यासाठी ते अस्वस्थ झाले नाहीत. परंतू, टेंबे आता कोरोनाचा सावटामुळे आपल्या गावी जाण्यासाठी अस्वथ झाले आहेत.