मुंबई - देशभरात आजपासून (दि. 1 मे) 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानुसार आज मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात प्रतिकात्मक 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत होते. मात्र, त्याच वेळी कोविन ऍपमधून संदेश येऊन सुद्धा अनेक लाभार्थी लसीपासून वंचित राहिले. मोबाईलवर संदेश आल्याने सकाळपासून येऊन रांगेत उभे राहूनही लस मिळाली नव्हती. अखेर कोविन ऍपशी संपर्क केल्यावर सायंकाळी लाभार्थ्यांना लस मिळाली. यामुळे लसीसाठी पूर्ण दिवस घालवावा लागल्याने लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रतिकात्मक लसीकरण
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध व 45 वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. आज 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबईला लसीचा पुरवठा कमी होत असल्याने तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे लसीकरण 15 मे नंतर सुरू होईल असे सांगण्यात आले. मात्र, काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून लसीकरणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणा केली. त्यानुसार आज पालिकेकडे कमी प्रमाणात लस असतानाही 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेऊन आज प्रतिकात्मक लसीकरण सुरू केले. यानंतर लसीचा पुरेसा साठा आल्यावरच लसीकरण केले जाणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.
लसीसाठी दिवस घालवला
आजपासून सुरू झालेल्या लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातील शेकडो लाभार्थी राजावाडी रुग्णालयात आले. अनेकांना कोविन ऍपकडून मोबाईलवर संदेश आल्याने सकाळपासून लस घेण्यासाठी रांगा लावून बसले होते. लसीकरण दुपारी 1 वाजता सुरू होणार होते. सकाळपासून दुपारपर्यंत वाट बघितल्यावर ज्यांना स्लॉट एक आला त्यांची नावे आमच्या यादीत नसल्याने तुमचे लसीकरण होणार नाही, असे सांगण्यात आले. तुम्ही थोडावेळ वाट बघा असे या लाभार्थ्यांना सांगण्यात आले, अशी माहिती डॉ. तारकेश्वर पाटील व अभिजित सावंत यांनी दिली. दरम्यान, याबाबत राजावाडी रुग्णालयाने याबाबत कोविन ऍपकडे तक्रार केल्यावर आमचे सर्वांचे लसीकरण सायंकाळी करण्यात आल्याची माहिती डॉ. तारकेश्वर पाटील यांनी दिली.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 3 हजार 908 नवे रुग्ण, 90 रुग्णांचा मृत्यू