मुंबई- शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या संख्येवर नियंत्रण रहावे आणि नागरिकांनी नियमाचे पालन करावे यासाठी महानगरपालिकेकडून क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी नियुक्त केलेल्या क्लीन-अप मार्शलला मारहाण होण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी अशाच एका क्लिनअप मार्शलला बोगस क्लीन-अप मार्शल समजत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अविनाश काकडे असे या क्लिनअप मार्शलचे नाव असून याबाबत घाटकोपर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अविनाश मुंबई महानगरपालिका विभागात कंत्राटी तत्वावर क्लिन-अप मार्शल म्हणून काम करतात. काल (मंगळवार) ते घाटकोपरच्या ९० फूट रोड येथे मास्क न घातलेल्या नागरिकांवर कारवाई करत होते. यावेळी त्यांनी गणवेश परिधान केला नसल्याने त्यांना बोगस क्लिनअप मार्शल समजत काही तरुणांनी बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी याविषयी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे चौकशी करत त्याच्या आयडीकार्ड व कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बोगस क्लीन-अप मार्शल नसल्याचे समजले आणि त्याला सोडून देण्यात आले. मात्र या मारहानीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
गणवेश नसल्याने गैरसमज
क्लीन-अप मार्शल अविनाश काकडे हे मास्क न घातलेल्या लोकांवर कारवाई करताना गणवेशात नव्हते यामुळे येथील लोकांना गैरसमज झाला आणि त्यांना बोगस क्लीन-अप मार्शल समजत मारहाण करण्यात केली. मात्र, अशाप्रकारे मारहाण होणे योग्य नसल्याचे मत काही नागरीक व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी महापौरांनी घेतलेली क्लिनअप मार्शलची बैठक
मास्क कारवाई दरम्यान मुंबईकर आणि मार्शलमध्ये होणाऱ्या भांडणावर तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी काही दिवसांपूर्वी महापौर बंगल्यावर क्लिनअप मार्शलची बैठक घेतली होती. त्यात लोकांशी कसे वागावे याबाबत धडे दिले होते. नागरिकांना देखील नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले होते.