मुंबई - मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथील चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये येत्या ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोठी रुग्णालये, खासगी रुग्णालय याठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच चीन, दक्षिण कोरिया, ईटली, जर्मनी, स्पेन आणि इराण, फ्रान्य येथून आलेल्या प्रवाशांना वेगळे ठेवण्यात येणार आहे. त्यांना १५ दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तसेच आपल्याकडे सापडलेले रुग्ण हे दुबई आणि अमेरिकेवरून आलेले आहेत. त्यामुळे केंद्र शासनकडे निवेदन देऊन या देशांचा समावेश वरील सात देशांच्या यादीत करावा, अशी विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रेल्वे आणि बससेवा या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या बंद करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळा. तसेच राज्यशासनातर्फे संस्था धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली अथवा मिळाली असेल तर ती रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा आणि महाविद्याल येत्या ३० मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच इतर ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची सध्या गरज नाही. त्यामुळे शिक्षण खात्याशी बोलून पुढील निर्णय घेणार आहोत. तसेच इतर खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्यांना वर्क फ्रॉर्म होमचा मार्ग अवलंबवण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
कोरोना हा विषाणूचा नवीन प्रकार आहे. त्यामुळे त्याच्या चाचणीसाठी अनेक उपकरणांची गरज असते. ती उपकरणे वाढवण्याची राज्य शासनाची तयारी आहे. मात्र, त्यासाठी केंद्र शासनाची मदत आणि परवानगीची गरज आहे. त्याबद्दल मी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी बोललो आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रदेखील पाठवले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.