मुंबई- केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण कच्चे असल्यामुळेच चीन आपल्या हद्दीत येत आहे. यामुळे आपल्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. आज सुद्धा चीन आपल्या हद्दीत पुढे आला आहे. अजूनही त्यांचे अतिक्रमण सुरू आहे, हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असून यामध्ये केंद्र सरकारने सुधारणा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
चीन आणि भारत सीमेवर गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या झटापटीत वीरमरण आलेल्या जवानांना आज प्रदेश काँग्रेसकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यासाठी मंत्रालया शेजारी असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसकडून ‘शहीदों को सलाम दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.
बाळासाहेब थोरात यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासोबत ज्येष्ठ नेते भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.
चीन सीमेवर वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसकडून आज राज्यभरात 'शहीदों को सलाम दिवस' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीचा मुख्य कार्यक्रम मुंबईत पार पडला यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. चुकीच्या धोरणामुळेच भारतीय सैनिकांना वीरमरण आले, असा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे सैनिक आपल्या हद्दीत घुसले नसल्याचे सांगितले. परंतु, वस्तुस्थिती वेगळी आहे. वस्तुस्थिती केंद्र सरकारकडून लपवली जात आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. आपले 20 जवान हुतात्मा झाल्यानंतरही ही चीनला जो धाक दाखवणे आवश्यक होते, तो दाखवण्यात आला नाही. यामुळे केंद्र सरकारने आता तरी आपले परराष्ट्र धोरण अधिक कडक करून आपल्या देशाच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी थोरात यांनी केली.