मुंबई - दीड वर्षांच्या लहान मुलाने खेळता खेळता हेअर पीन गिळली. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पण, परळ येथील खासगी रुग्णालयीतल डॉक्टरांनी त्याच्यावर एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
निलेश हरड यांच्या रोनित या दीड वर्षाच्या मुलाने हेअर पीन गिळल्याचा प्रकार मुंबईत घडला. पीन गिळल्यावर त्याला अन्ननलिकेत त्रास जाणवू लागला. मानेच्या भागात ही पीन अडकली होती. यामुळे रोनीतला रक्ताच्या उलट्या होत होत्या. रोनितच्या पालकांनी त्याला तातडीने जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याचा एक्स रे काढला. यात त्याच्या कंठामध्ये ४ सेमी लांबीची हेअर पीन अडकल्याचे दिसून आले.
डॉक्टरांनी त्याच्यावर एन्डोस्कोपी शस्त्रक्रीया केली. ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती असे डॉक्टरांनी सांगितले. आतमध्ये जाऊन पीन उघडली होती. तिचा एक भाग अन्ननलिकेत रुतला होता. तर, दुसरा भाग स्वरयंत्रामध्ये गेला होता. यामुळे मुलाचा आवाज जाण्याचा धोका उद्घवू शकला असता, अशी माहिती डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.
रोनितच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, की रोनतने पीन गिळली असेल अशी आम्हाला कल्पना नव्हती. पण, डॉक्टरांनी योग्य निदान केले. ताबडतोब उपचार केल्यामुळे आमच्या मुलाचे प्राण वाचले. दरम्यान, पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या हाताला इजा होणारी कोणतीही वस्तू पोहोचू नये याकडे लक्ष द्यायला हवे. ५ वर्षांच्या आतील मुलांना जपले पाहिजे असा सल्ला डॉक्टरांनी दिला.