मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बालमजुरीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. यात गेल्या सहा वर्षात 2 हजार 620 खटले नोंदविले गेले आहेत. त्यातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या 1 हजार 039 मुलांची सुटका केली असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबईतील बाल मजुरी अंतर्गत दाखल गुन्ह्याची माहिती, आरटीआयमधून मागवण्यात आली होती. यात २०१३ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण १७४ खटले दाखल झाले तर भीक मागणार्या ७२ मुलांना सोडविण्यात आले. २०१४ मध्ये एकूण ४४१ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणार्या १२४ मुलांना सोडविण्यात आले. २०१५ मध्ये एकूण ७१८ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्या ४५७ मुलांना सोडविण्यात आले. २०१६ मध्ये एकूण ५३५ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणाऱ्या १६५ मुलांना सोडविण्यात आले. २०१७ मध्ये एकूण ४८६ खटले दाखल झाले होते, तर भीक मागणार्या १३८ मुलांना सोडविण्यात आले. २०१८ मध्ये एकूण २२३ खटले दाखल झाले होते, तर भीक मागणार्या ३१ मुलांना सोडविण्यात आले. मे २०१९ पर्यंत बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४३ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणार्या ३४ मुलांना सोडविण्यात आले.
देशात कुठल्याही ठिकाणी बालमजूर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही बऱ्याच ठिकाणी खास करून गारमेंट कंपनी, जरिकाम कारखाना , हॉटल्स आणि घरकाम ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालमजूर आढळून येतात. भारतात 14 वर्षाखालील मुलांना बालमजूर म्हणून ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यात कमीत कमी 6 महिने तर जास्तीत जास्त 2 वर्षाच्या तुरुंगवसापासून 50 हजारापर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो. मात्र, या कायद्याची प्रखर अंमलबजावणी होत नसल्याने बालमजुरीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही.