मुंबई - 2 अ (दहिसर ते डीएन नगर) आणि 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मेट्रो मार्गासाठी बंगळुरू येथे 11 मेट्रो गाड्यांची बांधणी करण्यात येत आहे. त्यानुसार आता 27 वा 28 जानेवारीला यातील पहिली गाडी मुंबईत दाखल होणार आहे. या देशी बनावटीच्या पहिल्या गाडीचे अनावरण 29 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या अनावरण कार्यक्रमाची जोरदार तयारी सद्या सुरू असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कोरोनामुळे झाला विलंब
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे काम डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण होऊन ते सेवेत दाखल होणार होते. पण, कोरोना-लॉकडाऊनचा फटका या प्रकल्पाच्या कामाला बसला. त्यामुळे, प्रकल्पाची डेडलाईन सहा महिने पुढे गेली. त्यामुळे, आता मे-जून 2021 ची नवी डेडलाईन या दोन्ही मार्गासाठी एमएमआरडीएने दिली आहे. दरम्यान, या दोन्ही मार्गासाठी 11 गाड्यांची बांधणी बंगळुरू येथे करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून भारतातच मेट्रो गाड्यांची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या 11 गाड्यांमधील 1 गाडी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत येणार होती. मात्र, गाडीचे काम पूर्ण न झाल्याने एक महिना विलंबाने आता गाडी मुंबईत येणार आहे. 27 व 28 ला गाडी मुंबईत दाखल होणार आहे.
मार्चमध्ये ट्रायल रन?
कोरोनामुळे पहिली डेडलाईन चुकली, तरी पुढे आणखी उशीर होऊ देणार नाही, असे म्हणत एमएमआरडीएने कामाला जोर दिला. दरम्यान, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो गाडी आल्यानंतर 14 जानेवारीला ट्रायल रन घेण्यात येणार होती. पण, गाडीच न आल्याने ट्रायल रन आपोआपच रद्द झाली. पण, आता मात्र पहिली मेट्रो गाडी येणार आहे. तर, उर्वरित गाड्या एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. तेव्हा आता पहिली गाडी आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार करत मार्चमध्ये मेट्रोची ट्रायल रन घेण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्यासह दोघांना अटक
गाडी येण्यास विलंब झाला, ट्रायल रन पुढे गेली. पण, आता मात्र मेट्रो गाडी येणार असून 29 जानेवारीला मुख्यमंत्री या गाडीचे अनावरण करणार आहेत. तेव्हा येत्या काही महिन्यातच मुंबईकरांच्या सेवेत आणखी दोन मेट्रो मार्ग दाखल होतील आणि मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल.
मंत्री शिंदेंनी केली मेट्रो ट्रेनची पहाणी
दरम्यान आज मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे काम पूर्ण झाले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) प्रकल्पाला भेट देत मेट्रो गाडी व तिच्या निर्मितीच्या कामांची प्रत्यक्ष पहाणी केली.
२२ जानेवारी रोजी पहिली मेट्रो गाडी मुंबईच्या दिशेने प्रयाण करणार. तब्बल सात वर्षानंतर मुंबई नवीन मेट्रोच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून तिच्या ‘फर्स्ट लुक’ बाबत मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे. ही मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी होईल. त्यानंतर मे, २०२१ पासून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा - धर्माला बदनाम करण्यासाठी हिंदूच कारणीभूत - राजू श्रीवास्तव