मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय, प्रेमाची साय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ( Sindhutai Sapkal dies of heart attack ) मंगळवारी ४ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्रासह सर्व देश शोकसागरात बुडाला. राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, कलाकार सर्व सामान्य जनता व भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा श्रध्दांजली वाहून आपला शोक व्यक्त केला. मात्र समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी मृत्यू पुर्वी एक खंत व्यक्त केली होती. ताईंचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात लावण्यात आलेले आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी ( Sindhutai Sapkaal Mother of orphans ) व्यक्त केली होती. ती व्हिडीओ क्लिप आता सर्वत्र व्हायरल होत ( Sindhutai Sapkal's video clip goes viral ) आहे. त्यानंतर आता त्यांच्या या व्हिडीओ क्लिपची मुख्यमंत्र्यानी दखल घेतली आहे.
काय आहे क्लिपमध्ये ?
माझं पुस्तक दाहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे. पण महाराष्ट्रात नाही. याचं कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं बाबा. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. सोन्यासारखी माणसे या मातीमध्ये गेली. परत नव्यानी उगवले म्हणून हा महाराष्ट्र उभा आहे. अन् आम्ही हारुन चालेल, आम्ही थकून चालेल. अशा स्वरुपाची व्हिडीओ क्लिप आहे. जी सद्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जन्मलेल्या सिंधुताईची अखेरची इच्छा ( Sindhutai Sapkal's last wish ) शिक्षण विभागाने आता पूर्ण करावी, असा सूर आज शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पुर्ण करावी, असा एक संदेश समाजात फिरत होता. ती क्लिप व सिंधुताई सपकाळ यांची खंत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी मुंबई येथील शिक्षक उदय नरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल-
मुख्यमंत्र्यांनी त्या क्लिपची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे. तसेच एक पत्र शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा व मानवतावादी दृष्टिकोन लवकरच शालेय अभ्यासक्रमात पाहायला मिळेल, असा आशावाद शिक्षकवर्ग व्यक्त करत आहे.