मुंबई : एकीकडे कोकणातील रिफाय प्रकल्पावरून पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक केंद्रीय निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याने ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेले पहायला मिळत आहे.
खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप : ठाकरे गटाचे नेते सातत्याने कोकण किंवा उर्वरित महाराष्ट्रात दौरे करत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सतत आरोप केला राज्य सरकारवर केले जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून सतत विरोधकांना धमक्या मिळत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. असाच आरोप ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, त्यांनी हा आरोप अन्य कोणाबद्दल केला नसून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल केला आहे.
ठाण्यातील गुंडांच्या टोळीला सुपारी : या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहले आहे. या पत्रात खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूरच्या टोळीला मला जीवे मारण्याची सुपारी श्रीकांत शिंदेंनी दिली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ही टोळी मला मारणार असल्याची माहिती मिळाल्याचे खासदार संजय राऊत त्यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या टोळीला सुपारी देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे. सोबतच महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पाहता ही बाब आपल्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे असल्याचे देखील संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही : या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्या राजकारणावरून चिंता व्यक्त केली आहे. सोबतच महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांना सातत्याने येणाऱ्या धमक्यांचे फोन ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सोबतच त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची कमी केली गेलेली सुरक्षा यावरून देखील नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय आहे पत्रात? खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, 'गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे तसेच हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही, असे राजकीय निर्णय होत असतात.
माझी हत्या करण्याची सुपारी : लोकप्रतिनिधींना सुरक्षा देणे हा राज्य सरकारचा विषय आहे. गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. तरी देखील मी इथे एक गंभीर मुद्दा उपस्थित करीत आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूरच्या टोळीने माझी हत्या करण्याची सुपारी घेतली आहे. ही सुपारी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थिती लक्षात घेता हा मुद्दा आपल्या निदर्शनास आणुन देणे म्हत्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.