मुंबई - जेष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या खटल्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. पानसरे खून खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत का? अशी तोंडी टिपण्णी केली होती.
याबाबत विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातील काही खटल्यातील सुनावणी दरम्यानच्या न्यायालयातील निकालांचेही संदर्भ दिले. लोकशाहीच्या तीनही स्तंभांनी आपल्या चौकटीत काम करावे. एकमेकांच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये अशी अपेक्षा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मी अपेक्षा व्यक्त करतो की संविधानाने जे तीन स्तंभ तयार केले आहेत. त्या स्तंभांनी एकमेकांच्या स्वायत्त अधिकाराचा सन्मान करावा. सरकार न्यायव्यवस्थेचा सन्मान आणि आदर करते. त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थेने देखील सरकारचा आदर करायला हवा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर ज्या व्यक्ती किंवा संस्थेचा प्रत्यक्ष प्रकरणात कोणताही सहभाग नसेल, अशा संस्था आणि व्यक्तींबाबत त्यांना आक्षेप नोंदवण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.