मुंबई - शिवसेनेला आपल्या पक्षाकडून मुख्यमंत्री बनण्याची हीच खरी संधी आहे. ही संधी त्यांनी दवडू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात मागील काही दिवसांपासून वाद सुरू असून हा वाद केवळ एक सोंग असल्याचेही भुजबळ म्हणाले.
सेना म्हणते आमचे 50 टक्के सत्तेत वाटा देण्याचे ठरले आणि भाजप म्हणते नाही, यावरून कोण खोटे बोलते हे त्यांनी ठरवले पाहिजे. जर सेना-भाजपची काही 50-50 टक्के सत्ता देण्याचे ठरलेले असेल तर त्यांनी सामंजस्यपणे निर्णय घ्यायला हवे होते. परंतु. तसे न करता रडत बसले आहेत. यामुळे एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे, असे भुजबळ म्हणाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापन करण्यास उशीर झाला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर विचारले असता भुजबळ म्हणाले, हे केवळ एक दबावाचे राजकारण आहे. त्यामुळे अशाप्रकारे कोणी राष्ट्रपती राजवटीबाबत बोलत असेल तर त्याला भीक घालू नये. लगेच राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. त्यासाठी काळजीवाहू सरकार काम करत असते एक दोन महिन्याचा कालावधी उलटला तर राष्ट्रपती राजवटीचा विषय होऊ शकतो.