मुंबई - चेंबूरच्या पंचशीलनगरमधील रहिवासी ११४ दिवसांपासून चक्री उपोषणास बसले आहेत. हक्काचे घर, बौद्ध विहारसह इतर मूलभूत मागण्यांसाठी अमरमहाल पूलाजवळ हे आंदोलन सुरू आहे. यातील आंदोलक रामू सुखदेव मकासरे (वय ४३) यांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनाकडे झोपडपट्टी पुनर्विकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने विकासक व संबंधित प्राधिकरणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
पंचशीलनगर मधील ३१० रहिवाशी मागील ४ ते ५ वर्षांपासून घरापासून वंचित आहेत. तसेच बुद्धविहाराचे योग्य ठिकाणी नियोजन केले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. जागेचे विद्रुपीकरणही सुरू असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. अर्धवट बांधलेल्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अशा अनेक मागण्यासाठी येथील रहिवासी २८ नोव्हेंबर २०१८ पासून साखळी उपोषणास बसले आहेत.
यापैकी उपोषणकर्त्या गीता मकासरे यांचे पती रामू मकासरे काही महिन्यांपासून आजारी होते. हक्काचे घर मिळत नसल्याच्या धक्क्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. गुरुवारी सकाळी सायन रुग्णालयात रामू मकासरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी टिळकनगर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, असे उपोषणकर्ते संतोष सांजकर यांनी माहिती दिली.