मुंबई - दोन सराईत गुन्हेगारांनी एक व्यक्तीला आम्ही कोरोना अधिकारी असल्याचे सांगून चक्क एटीएम कार्डद्वारे 54 हजार रुपयांचा गंडा घातला. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. यानंतर पोलिसांनी काही वेळातच मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली. सोहन गणेश वाघमारे आणि सागर केतन कदम अशी आरोपींची नावे आहेत.
एकीकडे कोरोनाचे महासंकट, लॉकडाऊन आणि मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचाच गैरफायदा घेत काही गुन्हेगारांनी लोकांना गंडविण्याचा प्रकार मुंबई पूर्व उपनगरातील चेंबूर परिसरात समोर आला आहे. चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सराईत गुन्हेगारांनी एक व्यक्तीला आम्ही कोरोना अधिकारी असल्याचे सांगितले आणि चक्क एटीएम कार्डद्वारे 54 हजार रुपयांचा गंडा घातला. पीडित व्यक्तीने याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा - धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने मासळी विक्रेत्याची स्मशानभूमीत गळफास घेवून आत्महत्या
यानंतर पोलिसांनी काही वेळातच दोन आरोपींना अटक केली. सोहन गणेश वाघमारे आणि सागर केतन कदम अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पोलीस अभिलेकावरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून होंडा सीटी कार सहित अन्य एटीएम कार्डही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती चेंबूर पोलीस गुन्हे शाखेचे अधिकारी हेमंत गुरव यांनी दिली. तर कोरोनासारख्या महाभयंकर साथीत अशा घटना होत असताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.