मुंबई - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी नीतिमत्तेचे राजकारण केले. त्यांच्या निधनाने भारताचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.
दीक्षित यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. त्यांच्या आजारपणाबाबत कधीही चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्या निधनाने वृत्त ऐकून धक्का बसला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या त्या महिला राजकारणी होत्या. त्यांचा आदर्श इतर नेत्यांनी घ्यावा असेही पाटील म्हणाले.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी १५ वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.