मुंबई : रामनारायण रुईया महाविद्यालयात दोन दिवसांची आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी बोलताना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या प्रस्तावाला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे भरडधान्याच्या योगदानाचे महत्व, आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्याचे महत्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी यांची उपस्थिती : या उद्घाटनप्रसंगी रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस.पी. मंडळी, ॲड.एस.के.जैन, श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड.मिहीर प्रभु देसाई, कामिनी दोंदे, उपप्राचार्य डॉ.वर्षा शुक्ला तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरडधान्य आरोग्यासाठी उत्तम : निसर्गशेतीसाठी उत्तम पीक असलेले, कमी पाण्याची आवश्यकता असणारे मिलेट हे निसर्गस्नेही पिके आहेत. पृथ्वीच्या व माणसांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेणारी ही जादुई धान्य समजून घेणे खूप रोचक आहे. गहू व तांदूळ सोडून इतर जे धान्य नियमित आपल्या आहारात वापरले जाते त्याला आपण भरडधान्य असे म्हणू शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी ही भरडधान्य आपण जसेच्या तसे पीठ करून खाऊ शकतो तर वरई, राळा, बर्टी, कोदो, डेंगळी ही इतर भरडधान्य त्यावरील असलेली साल बाजूला केल्यावर खाण्यायोग्य होतात. जसे तांदळाला साळ असते तशीच या बारीक धान्यांना साळ आवरण असते. पूर्वी उखळात कांडून किंवा मातीच्या जात्यावर भरडून हे आवरण काढले जाई. आता ते काम मशिनद्वारे केले जाते. अशा साल काढलेल्या भरडधान्यांचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात वापर केला जातो.
भरडधान्य व त्याचे प्रकार : एकूण ११ प्रकारचे भरडधान्य आतापर्यंत या गटात आहेत. सध्या त्यातील ९ भारतीय मिलेटची नावे व प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
ज्वारी (Sorghum) – ज्वारी हे सर्वदूर घेतले जाणारे पीक आहे. विशेषतः कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महराष्ट्रातील सोलापूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तर पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर भागात देखील याचे उत्पादन कमी-अधिक प्रमाणात होते. यात सफेद, पिवळी, लाल अशा विविध रंगछटा असणारी ज्वारी पाहावयास मिळते.
बाजरी (Pearl milllet) – कोरडवाहू जमिनीत अगदी कमी पाण्यावर येणारे बाजरीचे पीक पूर्वीपासून घेतले जात होते. काळ्या मातीत याची गोडी काही वेगळीच असते. यात देखील हिरवा, लाल, तपकिरी असे मुख्य रंग व त्यांच्या छटा दिसतात.
नाचणी (Finger millet) – नाचणीला आधीपासूनच सुपरफूड म्हणून मान्यता मिळालेली आहे. पूर्वी सर्व भागांत होणारी नाचणी आता फक्त आदिवासी डोंगरभाग व कोकणात केली जाते. यात सफेद व लाल-केशरी व मरून-लाल अशा रंगत येते.
वरई (Little millet) – आजही आदिवासी व कोकण भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. डोंगर शेतीतील हे मुख्य नगदी पीक आहे. यात कमी दिवसांच्या ते जास्त दिवसांच्या अशा विविध जाती आहेत.
वरी (Proso millet) – महाराष्ट्रातील काही भागांत वरईसारखेच दिसणारे हे धान्य पिकवले जाते. दिसायला हे अगदी वरईसारखेच असले, तरी त्याचे गुणधर्म व पोषकमूल्य भिन्न आहेत.
राळा/ भादली / कांग (Foxtail millet) – पूर्वी सर्व भागात राळा पिकवला जाई. राळ्याचा भात खाण्यासाठी चविष्ट लागतो. खानदेशात तर पितरांना राळ्याचीच खीर करण्याची परंपरा होती. यात देखील विविध रंग असतात.
कोदो/ कोद्रा/ हरिक (kodo millet) – एकावर एक असे सात थर असणारे हे धान्य. याचे वैशिष्ट्य म्हणजे आवरण काढले नाही तर हे अनेक वर्ष ठेवता येते. याची शेती बऱ्याच प्रमाणात गडचिरोली, धुळे आणि कोकणात केली जाते.
बर्टी (Barnyard millet ) – सर्वांत कमी दिवसांत पक्व होणारे हे धान्य. हे देखील अनेक रंगांत उपलब्ध असते. कोरडवाहू व अतिपाऊस असणाऱ्या भागात देखील हे उत्तम येते. खाण्यासाठी चविष्ट व पौष्टिक असे हे धान्य आहे.
ब्राऊनटोप मिलेट (Browntop millet) – मूळचे भारतीय असलेले हे मिलेट धान्य सध्यातरी फक्त दक्षिण भारतात घेतले जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे धान्य खाल्ल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. भरपूर ऊर्जा यातून मिळते.
हेही वाचा : Healthy Ingredients : फिटनेस प्रेमींसाठी 5 आरोग्यदायी घटक