मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध ओमकार बिल्डरच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी ईडीकडून ओमकार ग्रुपचे चेअरमन कमल गुप्ता व मॅनेजिंग डायरेक्टर बाबूलाल वर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - अर्णब गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल करा - भाई जगताप
ओमकार ग्रुपकडून मुंबईत एस.आर.ए प्रोजेक्टच्या माध्यमातून येस बँकेकडून 450 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. मात्र, ओंमकार ग्रुपकडून अनधिकृतपणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हे पैसे वळवण्यात आल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सोमवारी (२५ जानेवारी) ओमकार ग्रुपच्या मुंबईतील नेपियन्सी रोड परिसरातील आशियाना इमारत, सायन परिसरातील ओमकार बिल्डरचे कार्यालय व प्रभादेवी परिसरातील ब्युमोंट अपार्टमेंट सारख्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारी दरम्यान ओमकार डेव्हलपरकडून विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जांच्या संदर्भातील कागदपत्र व विविध बँकांतील आर्थिक व्यवहार तपासले जात असून, यामध्ये ओमकार डेव्हलपर्सशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी सध्या सुरू आहे.
जेपी इन्फ्रास्ट्रक्चरवर झाली आहे कारवाई
काही दिवसांपूर्वी ईडीकडून अशाच प्रकारची छापेमारी जेपी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयांवर करण्यात आली होती. जेपी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उत्तर प्रदेश मधील एका मोठ्या नेत्याचा पैसा गुंतवण्याचा संशय तपास यंत्रणांना असून यासंदर्भात इन्कमटॅक्सकडूनसुद्धा छापेमारी करण्यात आल्याचे कळले.
हेही वाचा - उर्जामंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली; मनसेची पोलिसांत तक्रार