मुंबई- भारत सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षात जाहिरातींवर एकूण 713.20 कोटी रुपये खर्च केले असून यापैकी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिलेल्या जाहिरातींचा मोठा हिस्सा आहे, अशी माहिती पुढे आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते जतिन देसाई यांनी माहिती अधिकार कायद्यांर्तगत केलेल्या अर्जाच्या उत्तरात माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या ब्यूरो ऑफ आऊट्रीच अण्ड कम्युनिकेशन (बीओआर) ने ही माहिती दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ जाहिरातींवर 713.20 कोटी रुपये खर्च झाले असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 317.05 कोटी, मुद्रीत माध्यमांना 295.05 कोटी आणि इतर माध्यमांना 101.10 कोटींच्या जाहिरातींचा समावेश आहे.
दिवसाला सरासरी 1.95 कोटी खर्च
परकीय माध्यमांना दिलेल्या जाहीरातींवर किती खर्च झाला याची माहिती बीओआरकडे नाही, तसेच दिवसाला सरासरी 1.95 कोटी खर्च करण्यात आले असून या माध्यमांवर कोणत्या प्रकारच्या जाहिराती केल्या हे अद्यापही स्पष्ट नसल्याचे, आरटीआय कार्यकर्ते जतिन देसाई यांनी म्हटले आहे.