मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आपले स्वत:चे जीव धोक्यात घालून कर्तव्य तर बजावत तर आहेतच यासोबत ते सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. ते हजारो नागरिकांना मदत आणि अन्नदान करण्याचे काम करत आहेत. याशिवाय ते रेल्वे अधिकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून श्रमिक प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आणि अपघात टाळण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच ते सॅनिटायझर आणि मास्क पुरविणे, विशेष गाड्यांच्या बुकिंगमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या दलालांना अटक करण्याचीही जबाबदार पार पाडत आहेत.
मध्य रेल्वेने आतापर्यंत 5 लाखांहून अधिक श्रमिक कामगार आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना 380 हून अधिक श्रमिक विशेष गाड्यांमधून त्यांच्या घरी पाठविले आहे. या गाड्या सोडताना 1500 हून अधिक आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. हे जवान गाड्यांना एस्कॉर्ट करणे, मास्क घालण्यावर देखरेख ठेवणे, प्रवासात आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगणे, यावर लक्ष ठेऊन होते.
कुटुंबीयांचा असाही हातभार -
या संकटाच्या काळात आरपीएफ जवानाच्या कुटुंबातील सदस्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. त्यांनी कोरोना आजारापासून आरपीएफच्या जवानांचे संरक्षण व्हावे, यासाठी मास्क बनवून दिले आहेत. आत्तापर्यंत, कपड्यांनी बनविलेले सुमारे 13 हजार 919 मास्क, 1 हजार 522 फेस शील्ड कव्हर आणि 434 शिल्डो मास्क संलग्न केलेले कवच, या योद्ध्यांनी तयार केले आहेत.
तिकिटात काळाबाजार करणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा -
वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये जागा राखीव करण्याच्या तक्रारी अलीकडे सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वे आरपीएफने देशभरात एकत्रीत होणारे हे प्रयत्न ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवरील प्रवासी आरक्षण काउंटरवर विशेष मोहीम राबविली. या माहिमेअंतर्गत 3 लाखाहून अधिक किंमतीचे तिकिटे जप्त करून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा - रमजान ईदची नमाज घरातच अदा करा, मुस्लीम बांधवांना नवाब मलिकांचे आवाहन
हेही वाचा - नितेश राणे यांच्या व्हिडिओत तथ्य नाही; राजावाडी रुग्णालयाचे स्पष्टीकरण