मुंबई: मध्य रेल्वेने आपली सर्व स्थानके, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा सर्व रेल्वे स्थानके भंगारमुक्त करण्यासाठी झिरो स्क्रॅप मिशन सुरू केले आहे. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेला भंगार विक्रीमधून ४२५.३९ कोटी महसूल मिळाला आहे. फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या ३८८.८० कोटींच्या विक्री उद्दिष्टापेक्षा ९.४ टक्के जास्त रक्कम रेल्वेला मिळाली आहे. रेल्वे परिसरातून भंगाराच्या विल्हेवाट लावल्याने केवळ महसूल मिळवण्यातच मदत झाली नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे.
नॉन फेअर महसूल १९१ टक्क्यांनी वाढला: एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत रेल्वेला नॉन फेअर म्हणजेच परवाना, व्हिनाईल रॅपिंग, आऊट ऑफ होम कंत्राटे, रेल डिस्प्ले नेटवर्क करार, ट्रक टेम्पो पार्किंग कम स्टॅकिंग कॉन्ट्रॅक्ट यांच्या माध्यमातून ७८.८६ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. मागील वर्षी रेल्वेला २७.१० टक्के अधिक महसूल मिळाला होता. मागील वर्षापेक्षा यंदा १९१ टक्के अधिक महसूल रेल्वेला मिळाला आहे. याच कालावधीमध्ये ४.५६ लाख टन पार्सल आणि सामान वाहतुकीतून सुमारे २३२.५० कोटी रुपये महसूल मिळवला आहे. मागील वर्षी यायचं कालावधीत २०१ फेऱ्यांमधून २४.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेने मिळवले होते.
अलार्म चैन पुलिंग घटना: ट्रेनमधील चैन खेचण्याच्या घटनांमुळे ट्रेनच्या वेळेवर परिणाम होतो. तसेच प्रवाशांना त्याच त्रास सहन करावा लागतो. मध्य रेल्वेवर जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत चैन खेचण्याच्या ३४२४ घटना नोंद झाल्या. त्यात १९८० प्रवाशांवर कारवाई करून ९.९० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत ७७८ चैन खेचण्याच्या घटना नोंद झाल्या. त्यात ६६१ प्रवाशांवर कारवाई करून ४.५४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विद्युतीकरणातून १६७० कोटींची बचत: मध्य रेल्वेने ब्रॉडगेज मार्गांवर म्हणजेच ३८२५ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे दरवर्षी ५.२०४ लाख टन कार्बन फूटप्रिंट कमी झाला आहे. त्यामधून रेल्वेने १६७० कोटींची बचत केली आहे. २०१४ पासून पर्यावरणास अनुकूल आणि प्रदूषण कमी करण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. गेल्या ९ ते १० वर्षांत ही गती ९ पटीने वाढली आहे. रेल्वे पर्यावरणपूरक, किफायतशीर, वक्तशीर प्रवाशांचे वाहक आहे. नव्या भारतातील प्रवाशांच्या आणि मालवाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच इंधनाच्या बिलातही लक्षणीय घट करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी दिली.
हेही वाचा: MHADA Flat Lottery In Pune: म्हाडाकडून एकूण 6058 सदनिकांची ऑनलाईन सोडत; अनेकांना लागली घरांची लॉटरी