मुंबई - मध्य रेल्वेने रेल्वे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वास्थ्यासाठी 'रेल्वे कुटुंबीय देखरेख' या नावाने एक योजना सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रेल्वे कर्मचारी आणि त्याचे कुटुंबीय सुखरूप आहेत की नाही या माहिती ठेवली जाणार आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यास तत्काळ उपचार करता यावा हा यामागील उद्देश आहे.
मध्य रेल्वेच्या अंदाजे एक लाख कर्मचार्यांच्या राहत्या घराच्या पत्त्यासह मोबाईल क्रमांकांचे मॅपिंग करण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे वसाहतींबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याद्वारे मोबाईलवरून त्यांची रोजची उपस्थितीही सुरू केली आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अहवाल दररोज सादर करण्यात येणार आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास पुढील आवश्यक कारवाईसाठी त्यांना तत्काळ जवळच्या रेल्वे रूग्णालयात भरती केले जाईल.
यासाठी वैद्यकीय अधिकार्यांसह वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विविध नामनिर्देशित अधिकारी आणि पर्यवेक्षक, कल्याण निरीक्षकांच्या सर्व वसाहतींमध्ये काळजीवाहू समिती कार्यरत करण्यात आल्या आहेत. या योजनेचा प्रसार करण्यासाठी 'आरोग्य सेतु अॅप'चा तपशील सर्व रेल्वे कर्मचार्यांना वैयक्तिक संदेशाद्वारे आणि युनियन संघटनांच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे.