मुंबई - मध्य रेल्वे आपल्या अखंड मालवाहतूक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. विविध राज्यांतील लॉकडाऊनच्या परिस्थितीदरम्यान, मध्य रेल्वेने अनेक मालवाहतूक धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत कर्मचारी तैनात केले आहेत. देशासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही यासाठी २४/७ सातत्याने कार्यरत आहे.
गेल्या चार दिवसात एकूण अंदाजे 5.66 लाख टन मालवाहतूक करण्यात आली आहे. 9 हजार 837 वॅगन कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील परळी, नाशिक, पारस, कोराडी आणि मौदा आणि मध्य प्रदेशातील सारणी व सिंगाजी येथे पाठविण्यासाठी 102 रॅकमध्ये कोळसा भरला गेला. एकट्या नागपूर विभागातून 100 रॅक आणि मुंबई विभागातून 2 रॅक चालविण्यात आल्या.
गायगाव, खापरी, तडाली इत्यादी विविध ठिकाणी पुरवठा करण्यासाठी पेट्रोल, तेल आणि वंगण (पीओएल) आणि एलपीजी गॅस 17 रॅकमध्ये आणले गेले. एकट्या भुसावळ विभागातून 13 रॅक्स चालवले गेले. तसेच कांद्याचा एक संपूर्ण रॅक चालविण्यात आला. कंटेनर वाहतुकीच्या 57 रॅकपैकी एकट्या मुंबई विभागातून 46 रॅक्स चालविण्यात आले. फर्टिलायझरच्या सर्व 6 रॅक्सचा भरणा मुंबई विभागातून झाली आहे.