मुंबई - 'ब्लू टीक' आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यावा आणि 'ब्लू टीक'पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावे, असा टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार 'ब्लू टीक' ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
ट्विटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा - जिल्हा प्रशासनांनी कोरोना परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना आटोक्यात
महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्याने हे घडल्याचे मत मंत्री मलिक यांनी व्यक्त केले. राज्यात सध्या दहा जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्ह्यात निर्बंध आहेत. तर काही जिल्ह्यात जास्तच निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होऊ, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला. जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ते दुसर्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.