मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज 15 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी महाराष्ट्राला पत्र पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून अनेक सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय पथकाकडून करण्यात आलेल्या 15 सूचना
- 1) कोरोना विषाणूचा संसर्ग आणि संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाची स्थापना करण्यात यावी.
- 2) प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्येक घरा-घरात जावून रुग्णांचा, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात यावा. सोबतच आयएलआय (ILI) आणि सारी (SARI) साठीही आरोग्य यंत्रणेद्वारे लक्ष ठेवावे.
- 3) पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 20 ते 30 व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. यामध्ये कुटुंब, परिसरातील लोक, कामाची जागा आणि इतर कारणांनी संपर्कात येणाऱ्यांचा समावेश असावा. ही शोध मोहीम महत्त्वाची असून ती तातडीने करण्यात यावी.
- 4) कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात यावे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण एकूण चाचण्यांच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी यायला हवे. आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी हा तपासणीसाठीचा मुख्य पर्याय आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रे, सार्वजनिक कार्यक्रम, बस थांबे , रेल्वे स्थानक, झोपडपट्ट्या, दाटीवाटीच्या परिसरात जलदगतीने चाचण्या कराव्यात.
- 6) सक्रिय रुग्णांपैकी 80 ते 85 टक्के जणांना गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात येण्याच्या धोरणाचा आढावा घ्यावा. एखाद्याला गृह अलगीकरणात ठेवण्याच्या केंद्राच्या सूचनांचे पालन होतेय का? याकडे लक्ष देण्यात यावे.
- 7) रुग्णाला घरात विलगीकरण करताना त्याच्यासोबत विलगीकरणात राहणाऱ्या कुटुंबीयांमध्ये कोणी जास्त धोका पातळीत आहे का? हे तपासण्यात यावे.
- 8) आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सुविधा आता पुरेशा असल्या, तरी परिस्थिती चिघळल्यास काय गरज लागेल, याचा विचार करून तयारी करावी.
- 9) रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्ससोबत उपचारांसाठीच्या नियमांची तपासणी करण्यात यावी.
- 10) नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचा तपास व्हावा.
- 11) मृत्यूची तपासणी (डेथ ऑडिट) पुन्हा सुरू करावे, 'फ्रंटलाईन वर्कर्स' लस घेण्यास उत्सुक नाहीत. याबद्दल पावले उचलण्यात यावी.
- 13) वयाने ज्येष्ठ असणाऱ्या आणि सहव्याधी असणाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग राज्य सरकारने वाढवावा.
- 14) कोरोना होऊ नये म्हणून वावरताना काय खबरदारी घ्यायची, यासाठी मोठी जनजागृती मोहीम राबवण्यात यावी.
- 15) रात्रीची संचारबंदी, आठवड्याच्या शेवटी टाळेबंदी यासारख्या उपायांचा संसर्ग रोखण्यासाठी वा नियंत्रित करण्यासाठी फारसा परिणाम होत नाही. म्हणूनच जिल्हा प्रशासनाने केंद्रीय आरोग्य खात्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे कठोर आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्यावर लक्ष्य केंद्रित करावे.
हेही वाचा - मनसुख हिरेन प्रकरणाचे धागेदोरे 'मातोश्री'वर, खा. नवनीत राणांचा गंभीर आरोप
हेही वाचा - राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर; केंद्र सरकारचे राज्याला पत्र
हेही वाचा - महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी आनंद महिंद्रांनी सांगितला उपाय