मुंबई : आधार कार्ड हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेलं आहे. आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र नाही तर प्रमुख कागदपत्र आहे. आर्थिक व्यवहार असो सरकारी कामं असो किंवा शासकीय लाभ असो यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य आहे. आधार कार्ड नसेल तर मोबाईल सीम कार्ड सुद्धा मिळत नाही. सरकारी कार्यालयं, बँका आदी ठिकाणी आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आधारकार्डबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता दिव्यांगासाठी आधार कार्ड तयार करण्यासाठी फिंगरप्रिंटची (बोटांच्या ठशांची) गरज भासणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासंदर्भात युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक्सवरुन ही महत्वाची माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळं दिव्यांग लोकांना आधार कार्ड तयार करणं अधिक सोपे जाणार आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळं बोगस आधार कार्डचा सुळसुळाट वाढेल, आणि खरे-खोटे आधार कार्ड कसं ओळखायचे हे आव्हान, डोकेदुखी पोलिसांसमोर वाढेल, असं देखील बोललं जातंय. परिणामी हा निर्णय शाप की वरदान यावर चर्चांना ऊत आला आहे.
फारसा फरक पडणार नाही : मागील काही वर्षापासून देशात मोठ्या प्रमाणात बोगस आधार कार्ड तयार केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये बांग्लादेश नागरिकांकडून हजारोच्या संख्येनं बोगस आधार कार्ड तयार केल्याचं उघडकीस आलं आहे. बोगस आधार कार्डची भीती असताना, आता बोटांच्या ठश्याशिवाय दिव्यांगासाठी आधार कार्ड तयार केले जाणार आहे, त्यामुळं आगामी काळात बोगस आधार कार्डची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात असताना, सायबर तज्ज्ञांनी मात्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. यामुळं फ्रॉर्ड होईल किंवा फारसे बोगस आधार कार्ड तयार केले जातील असं वाटत नाही, असं सायबर तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
डोकेदुखी वाढणार नाही : जिथं आधार कार्ड तयार केले जातात, त्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष दिव्यांग आल्यानंतरच त्यांचं आधार कार्ड तयार केलं जाईल. त्यांची अन्य माहिती तसेच इतर कागदपत्रे देखील प्रत्यक्ष आधार केंद्रावर घेतले जातील. त्यामुळं केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बोगस आधार कार्डचा सुळसुळाट वाढेल, असं मला वाटत नाही. उलट दिव्यांगासाठी सरकारने जो निर्णय घेतलाय, तो खूप महत्त्वाचा आणि चांगला आहे, असं आधार केंद्रावरील आधार कार्ड तयार करणारे बाळू कलागते यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :