मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने ठाणे महापालिकेला आदेश दिला की, 1 ऑगस्टपर्यंत वॉर्ड निहाय किती झाडांच्या बुंध्याला सिमेंट काँक्रिटीकरण आहे आणि ती काढले आहे किंवा नाही? याचा अहवाल द्यावा. तसेच याबाबत मुंबई महानगरपालिकेला देखील प्रतिवादी करण्यात यावे.
त्याबाबत लेखी निर्णय कळवा: पावसाळा सुरू झाला आहे. मागील तीन महिन्यात ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 300 झाड पडली. तसेच मागच्या काही महिन्यात झाड पडून एक वृध्द महिला मरण पावली. त्यामुळेच झाडांचे संरक्षण आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये झाडाची जपणूक महापालिकेने करायची असते; परंतु तसे झाले नाही. म्हणून मृत झालेल्या महिलेच्या वारसाला महापालिका नोकरीवर ठेवणार आहे किंवा नाही, याबाबत महापालिकेने लेखी निर्णय 1 ऑगस्ट पर्यंत कळवावा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले.
याचिकेतून कुठल्या मागणीला प्राधान्य? ठाण्यातील पर्यावरण संरक्षक कार्यकर्ते रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ठाण्यातील रस्ते वाचवण्यासाठी धाव घेतली. ठाण्यामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते वाढत आहेत. त्यामुळे नैसर्गिक रीतीने जोपासलेली झाडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे उन्मळून पडत आहेत. जोऱ्याचा वारा आला, वादळी पाऊस आला तर ती झाडे रस्त्याने चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडतात. यासारखीच एक घटना नुकतीच घडली. त्यामध्ये वालावलकर नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या वारसाला नोकरीवर घेणे, अनुकंपा तत्त्वावर कामाला लावणे याबाबत महापालिकेने याआधी तसेच केलेले आहे. म्हणून आता देखील महापालिकेने ती जबाबदारी स्वीकारावी, अशा आशयाची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाकडे केली.
ठाणे महापालिकेची भूमिका: या संदर्भात ठाणे महानगरपालिकेकडून माहिती दिली गेली की, 7753 झाडांच्या बुंध्याला अद्यापही सिमेंट काँक्रीटचे आवरण आहे. त्याबाबत काम सुरू आहे. 45 दिवसात आम्ही काम पूर्ण करू. परंतु रोहित जोशी यांनी त्याचे खंडन करत मुद्दा उपस्थित केला. यानुसार, त्यापेक्षा अधिक झाडे आहेत की, ज्यांच्या बुंध्याला सिमेंट काँक्रीटचे आवरण आहे. ते काढले पाहिजे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या नादात झाडांच्या बुंध्याला अवतीभवती चारी बाजूने एक मीटर रुंद मातीच असायला हवी. परंतु येथे सिमेंटच्या आवरण आहे ते काढले पाहिजे.
या घटनेकडे वेधले लक्ष: ठाणे महानगरपालिका त्यानंतर वृक्ष प्राधिकरण समिती यासंदर्भात काही करत नाही. म्हणून सिमेंट काँक्रेटच्या बुंध्याला असलेल्या आवरणामुळे झाड ठिसूळ होतात. त्यांची मुळ ठिसूळ होतात आणि झाडे कोलमडून पडतात. त्यामुळेच नागरिकांचा जीव जातो. म्हणून काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा जीव गेला. तिच्या वारसाला महापालिकेची ही जबाबदारी आहे की, त्याला नोकरी दिली पाहिजे. याचा आधार असा आहे की, पाच वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अशीच घटना घडल्यामुळे वकील किशोर पवार यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या वारसाला ठाणे महानगरपालिकेने नोकरी दिलेली आहे. त्याच आधारावर या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला न्याय द्यावा, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेला देखील प्रतिवादी करा: महापालिकेने यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला देखील आता याबाबत प्रतिवादी करा. याबाबत जी ऑर्डर येईल ती ऑर्डर मुंबई महानगरपालिकाला देखील लागू असेल. तसेच ठाणे महापालिकेने वॉर्डनिहाय किती झाडांच्या बुंध्यांना सिमेंट काँक्रिटीकरण आहे आणि ते काढणे बाकी आहे, याची माहिती सांख्यिकी आपण प्रतिज्ञापत्राच्या आधारे सादर करावी. 1 ऑगस्टपर्यंत हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करा, असे देखील खंडपीठाच्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.