मुंबई - अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज (बुधुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्ताने देशासह राज्यभर जल्लोष करण्यात येत आहे. राज्यात विविध ठिकाणी पेढे वाटून हा सोहळा साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रात हिंदू बांधवांकडून अनेक ठिकाणी भजन आणि कीर्तन करत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयात देखील राम मंदिर जन्मभूमी समारंभाचा मोठा कार्यक्रम करण्यात आला. मुंबईतील कांदिवली पोझर जिमखाना येथे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कुटुंबासह आणि राम भक्तांनी जय श्रीराम जयघोषात 15 फूट उंच हिलियम बलून हवेत उडवत राम जन्मभूमी भूमिपूजन उत्साह साजरा केला.
पुणे - अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्यानिमित्ताने पुणे शहरात आज विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काही ठिकाणी पेढे वाटून, तर काही ठिकाणी रांगोळी काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने शहरातील राम मंदिरांमध्ये प्रभू रामची नित्योपचार पूजा करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भाजप शिवाजीनगर मतदारसंघातर्फे 10 बाय 15 फुटांची रामाची आणि राममंदिराची रांगोळी साकारण्यात आली आहे. फोटोमध्ये दिसणारे प्रभू रामचंद्राची हुबेहुब प्रतिकृती रंगोळीकर गणेश खरे आणि अक्षय जोळी यांनी साकारली आहे. तसेच राहाळकर राम मंदिरात ब्राह्मण महासंघाच्यावतीने श्रीराम प्रभूंची आरती आणि राम मंदिराचा 492 वर्षाचा इतिहास सांगणारं पुस्तिका वाटप करण्यात आली आहे. शहरात विविध सामाजिक संस्था संघटनांच्यावतीने शहरात विविध ठिकाणी बुंदी ,लाडू ,पेठे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यवतमाळ - अयोध्यातील राम मंदिर भूमिपूजन पायाभरणी आज करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे उत्साह बघायला मिळत आहे. भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते दत्त चौकात, स्टेट बँक चौक, राममंदिर, आठवडी बाजार, आर्णी रोड, गांधी चौक यासह जिल्हाभरात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातून त्यावेळी जवळपास 770 कारसेवक गेले होते. त्यांनी आज जी राम मंदिराची पायाभरणी होत आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला. आमच्या जीवनातील हा सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी कारसेवकांनी दिल्या.

नागपूर - अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा आज पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरातही भाजपतर्फे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवाय भाजप महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रामायणाची आरतीही करण्यात आली. नागपुरातील प्रतापनगर चौकात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर राम नामाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
नागपुरात ५२ चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. शहरातील प्रतापनगर चौकातदेखील भजन व राम नामाचा गजर करत जल्लोश साजरा करण्यात आला. शिवाय कार्यकर्त्यांकडून फुगडी घालत राम नामाच्या घोषणाही देण्यात आल्या. त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान फटाकेही फोडण्यात आले. त्यानंतर भाजपा महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रामायणाची आरती करण्यात आली. शिवाय पुष्पवृष्टीदेखील करण्यात आली. दरम्यान आजच्या खास दिवसा निमित्त शहरात व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आरती, रामायण पठन असे कार्यक्रम दिवस भर असणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शिवाय भारताच्या संस्कृतीमध्ये, इतिहासामध्ये आजचा दिवस नोंदवला जाईल असा जल्लोष संपूर्ण देशात व नागपूर शहरातही सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सोलापूर - आयोध्येत आज श्री राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. सोलापुरातसुद्धा अनेक घरांमध्ये जल्लोष करण्यात येत आहे. घरांवर श्रीरामाचे ध्वज आणि गुढ्या उभारून घरांना तोरण बांधण्यात आले आहे. वसंत विहार येथील पतंजली योग समितीच्या केंद्रीय महिला प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांच्या " मानस " या निवासस्थानी गुढी उभारून श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सोलापूरच्या नव्या पेठेतील राम मंदिरात संस्कार भारतीच्या वतीने आकर्षक रांगोळीची सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील मूर्तींची सजावट आणि परिसर यामुळे उजळून गेला आहे. तसेच किल्ल्याशेजारी राहणाऱ्या एडवोकेट जेजे कुलकर्णी यांनी आपल्या सावली बिल्डिंगच्याजवळ रामाची प्रतिमा पूजन करून श्रीरामाच्या नावाचा जयघोष केला .

अहमदनगर - श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. याचा आनंदोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. साईबाबांच्या शिर्डीतही घरोघरी गुढी उभारत आणि रांगोळी काढत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिर्डीत साईबाबांच्या हयातीत रामजन्मोउत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. आजही शिर्डीत मोठ्या उत्सहात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. शिर्डीत घरोघरी रांगोळी काढत आणि गुढी उभारत आजचा आनंद साजरा केला गेला. शिर्डीतील साईमंदीराच्या कलशाजवळील इमारतीवर साई आणि रामभक्तांनी रामाच्या प्रचिमेच पुजन केले. त्यानंतर शिर्डीतील प्रसिद्ध गायक पारस जैन यांनी आजच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने रचलेले खास गित गीत सादर केले.
श्रीरामपूर येथील राम मंदिरासह जिल्ह्यात ठिक ठिकाणी मंदिरांना कडक पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. सध्या कोरोनाच्या कोरोनामुळे जमावबंदी तसेच मंदिरबंद असल्याने रामभक्तांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. अन्यथा आज देशभर दिवाळी साजरी झाली असती. मात्र, सध्या या परिस्थितीमुळे सर्व मंदिरात शुकशुकाट आहे. काही ठिकाणी घरावर लावण्यासाठी ध्वज वितरण करण्यात येत आहे. तर श्रीरामपूर येथे बेलापुर रोडवरील रामभक्तांनी नियमांचे पालन करुन घरोघरी लाडुचा प्रसाद पोहोच केला. तसेच १९९० आणि १९९२ च्या अयोध्येतील कारसेवेसाठी गेलेल्या कारसेवकांचा आज सायंकाळी गौरव करण्यात येणार आहे.

नाशिक - अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा संपन्न होताच येवल्यात लाडू वाटप करत जल्लोष करण्यात आला. शहरातील राम मंदिरात आकर्षक सजावटही करण्यात आली. सर्वात जुनी मागणी आज पूर्ण होत असल्याने सर्वाधिक आनंद येवल्यातील रामभक्तांना होत आहे. येवला शहरातील गंगादरवाजा येथील वनवासी राम मंदिरात आरती करण्यात आली.
हिंगोली - संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या आयोध्येतील श्री राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्या भूमीपूजनाचा भाजपच्यावतीने हिंगोलीत फटाके फोडून आनंद साजरा केला. यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे अन् बलिदान देणाऱ्यांचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आभार मानले.

अयोध्येत राम मंदिर उभारावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. अखेर ती वेळ आली. आज मोठ्या दिमाखात अयोध्येत श्री राम मंदिराचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 वाजून 40 मिनिटांनी भूमिपूजन झाले. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही हा आनंदोत्सव भाजपच्यावतीने साजरा करण्यात आला.
गोंदिया - अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातवरण आहे. मात्र, कोरोनामुळे जरी देशातील मंदिरे उघडली नसली तरी भाविकांनी आपल्या शहरातील राम मंदिराच्या तसेच हनुमान मंदिराच्या बाहेर उभे राहत पूजा अर्चना करीत आनंद साजरा केला. तर गोंदिया शहरातील सिव्हिलाईन परिसरात प्रसिद्ध हनुमान मंदिरातदेखील भाविकांनी मंदिर जरी बंद असले तरी मंदिराच्या बाहेर उभे राहत राम मंदिर निर्माणाचा आनंद साजरा केला.

जळगाव - अयोध्येत आज (बुदुवार) राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून जळगावातील श्रीराम रांगोळी ग्रुपच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सुवर्णनगरी असलेल्या जळगावातील प्रत्येक चौकात सप्तरंगी रांगोळ्या काढून राममंदिराचा भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो क्विंटल रांगोळीचा या उपक्रमात वापर करण्यात आला.
श्रीराम रांगोळी ग्रुप हा विविध धार्मिक कार्यक्रमावेळी आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ग्रुपच्या कुमुद नारखेडे या प्रमुख असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपचे स्वयंसेवक रांगोळ्या काढतात. संपूर्ण जळगाव शहरातील चौक सायंकाळपर्यंत रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात येणार असल्याचे कुमुद नारखेडे यांनी सांगितले.