मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेशषन (सीबीआय) विभागाकडून सुरू आहे. सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंग, घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी व घरातील कामे पाहणारा दीपेश सावंत या चौघांना घेऊन सीबीआय पथकाने शनिवारी सुशांतच्या वांद्र्यातील घरी घडलेल्या घटनेच 'रिक्रिएशन' केले. यानंतर काही गोष्टींचा खुलासा आता समोर आला आहे.
आत्महत्या करण्याच्या काही दिवस अगोदर सुशांतने गांजा ओढला होता, असे निरज सिंग याने सांगितले आहे. मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने या गोष्टीचा खुलासा केला असून आत्महत्या करण्याच्या काही दिवस अगोदर स्वतः सुशांतला गांजाचा रोल बनवून दिल्याचे त्याने सांगितले. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सुशांतच्या घरी पार्टी असायची, या पार्टीमध्ये त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पीठानी आणि इतर काही आमंत्रित व्यक्ती यायच्या. पार्टीत सुशांत दारू, गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे नीरज सिंगने त्यांच्या दिलेल्या जबानीत म्हटले आहे. लॉकडाऊन काळात सुशांत आणि त्याची मैत्रिणी रिया चक्रवर्ती हे दोघे सोबतच राहत होते. या दरम्यान सकाळी उठल्यानंतर हे दोघेही व्यायाम करत होते. त्यानंतर दुपारचे जेवण झाल्यावर काही वेळानंतर पुन्हा इमारतीच्या छतावर जाऊन दोघेही योगा करायचे. रात्रीचे जेवण घेतल्यानंतर सुशांत उशिरा झोपायला जात असे.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : कूपर रुग्णालयातील शवागरात रियाने घालवली होती 45 मिनिटे
8 जूनला सुशांत आणि रिया यांच्या दरम्यान काही कारणावरून खटके उडाल्यानंतर रियाने नीरजला तिची कपड्यांची बॅग भरण्यास सांगितली होती. यानंतर ती तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीसोबत सुशांतचे घर सोडून निघून गेली.
घर सोडल्याचे रियाने सुशांतच्या बहिणीला कळवले
सुशांतची बहीण मितूसिंहने बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 8 जून रोजी रिया आणि सुशांतचे मोठे भांडण झाले होते. याची माहिती रियाने स्वतः मितूसिंहला फोन करून दिली होती. त्यानंतर 9 जून रोजी मी स्वतः सुशांतला भेटायला त्याच्या घरी गेली होते. काही दिवस त्याच्यासोबत राहिल्यानंतर, रियासोबत भांडण झाले असून ती आता घर सोडून गेली आहे आणि कदाचित ती पुन्हा येणार नाही, असे वाटते, असे तो म्हणाला होता.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सुशांतचा स्वयंपाकी नीरजची सीबीआय चौकशी सुरू
यावर सुशांतला मी समजावण्याचा प्रयत्न केला. 14 जूनला सुशांतचा मित्र सिद्धार्थचा फोन मला आला त्यावेळेस कळले की, सुशांत बऱ्याच वेळापासून त्याच्या खोलीचा दरवाजा उघडत नाही. त्यामुळे मी तत्काळ त्याच्या घरी जाण्यास निघाली. या दरम्यान त्याच्या मोबाईलवर सतत फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. घरी आल्यानंतर सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलविण्यात आले. त्यानंतर दरवाजा उघडला गेला, त्यावेळी सुशांतचा पंख्याला लटकलेला मृतदेह आम्हाला पाहायला मिळाला.