मुंबई- हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या मुंबईतील बांद्रा पाली हिल स्थित राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणी मोठा वादविवाद झाला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचे पथक मुंबईत तपास करीत आहे. यासंदर्भात सुशांत सिंह याने बांद्रा स्थित ज्या घरात आत्महत्या केली होती त्या घराचा मालक संजय लालवाणी याची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली आहे.
सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या का केली? याबद्दलचा कुठलाही पुरावा पोलिसांना अद्याप मिळालेला नसून सुशांत सिंहने आत्महत्या करताना कुठलीही सुसाईड नोट सोबत ठेवली नसल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले होते. मुंबईतील ज्या ठिकाणी सुशांत सिंहने आत्महत्या केली, त्या पाली हिल येथील माऊंट ब्लँक या इमारतीतील घर सुशांत याने जानेवारी २०२० मध्ये ३ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.
घरासाठी सुशांत सिंहने ३६ महिन्यांचा करारनामा केला होता, जो डिसेंबर २०२२ पर्यंत होता. हा करार सुशांत सिंह याने घरमालक संजय लालवानी सोबत केला होता. त्यासाठी त्याने १२ लाख ९० हजार रुपये डिपॉझिटसुद्धा भरले होते. पहिल्या वर्षासाठी तब्बल ४ लाख ५० हजार रुपये भाडे यावेळी ठरविण्यात आले होते. व त्याच्या पुढच्या वर्षी ४ लाख ६० हजार, तिसऱ्या वर्षासाठी ४ लाख ७२ हजार भाडे भरण्याचा करार करण्यात आला होता. ३ हजार ६०० स्क्वेअर फुटांचे दुमजली हे घर होते. यासंदर्भात संजय लालवानी याची चौकशी सीबीआयने केली आहे.
हेही वाचा- आज विसर्जनादरम्यान समुद्राला मोठी भरती; भाविकांना काळजी घेण्याचे महानगरपालिकेचे आवाहन