मुंबई - राज्यात होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मात्र, जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.
हमीपत्रासाठी मंगळवारी दुपारपर्यंत वाढ
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातवैधता पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील कोणताही पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी ७ डिसेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे हमीपत्र असणार आहे.
जातवैधता प्रमाणपत्रासाठी एक वर्षाची मुदत
उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. पण, राज्य शासनाने ६ डिसेंबरच्या अध्यादेशान्वये संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदत देण्यात आल्याची माहिती मदान यांनी दिली आहे.
हे ही वाचा - Maharashtra Corona Update - राज्यात दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या 518; ओमायक्रॉनचे 10 रुग्ण