मुंबई - लॉकडाऊन काळात सोशल माध्यमांचा वापर अधिक वाढल्याचे समोर आले आहे. मात्र, सोशल माध्यमांवरील डेटिंग अॅप किंवा मॅट्रिमोनियल अॅपवर तुम्ही अधिक वेळ घालवत असाल तर तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. कारण या अॅप्सचा वापर करून लुटले जात असल्याचे समोर आले आहे.
डेटिंग अॅप , मॅट्रिमोनियल अॅप्सचा असा होतोय वापर
ऑनलाइन डिजिटल माध्यमाचा वापर वाढत असताना याच्या माध्यमातून सायबर गुन्हेसुद्धा वाढत असल्याचे समोर आले आहे. खास करून इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल माध्यमांचा वापर करत आर्थिक लूट केल्याचे बरेच प्रकार समोर येत आहेत. या सोशल माध्यमांवर महिलांसोबत संभाषण करत असताना काही वेळा लग्नाचे आमीष दाखवून किंवा शरीर संबंध ठेवण्याचे प्रलोभन देऊन पीडित व्यक्तीचे नग्न फोटो किंवा व्हिडिओ मिळवला जातो. या नंतर हेच नग्न फोटो-व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपये लुटले जात असल्याच्या शेकडो घटना समोर आल्या आहेत.
आयटी इंजिनियरला ६ लाखांना लुटले
लॉकडाऊन काळात नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण असल्यामुळे डेटिंग ॲप व मॅट्रिमोनियल ॲप्सचा वापर करून खंडणी उकळण्याचे प्रकारही समोर आलेले आहेत. अशाच एका प्रकरणामध्ये एका ४५ वर्षीय आयटी इंजिनियरला तब्बल ६ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. एका डेटींग ॲपच्या माध्यमातून हा पीडित व्यक्ती तीन महिलांच्या संपर्कात आला होता. या महिलांच्या संपर्कात आल्यानंतर बरेच दिवस एकमेकांशी संवाद साधल्यानंतर पीडित व्यक्ती व महिलेचे भेटण्याचे ठरले. महिलेला भेटायला गेल्यानंतर तिच्यासोबत असलेल्या इतर महिलांनी इंजिनियरला एका घरात डांबून त्याचे काही नग्न फोटो काढले व ते सोशल माध्यमांवर पोस्ट करायची धमकी देत त्याच्याकडून तब्बल ६ लाख रुपये लुटले.
या गोष्टी टाळण्यासाठी काय करायला हवे
वरिष्ठ सायबर एक्स्पर्ट रितेश भाटिया यांच्यानुसार लॉकडाऊन काळात इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक लूट होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गोष्टींपासून सावध राहण्यासाठी वापरकर्त्यांनी १)डेटिंग अॅप व मॅट्रिमोनियल अॅपवर अज्ञात व्यक्तीशी होणारे संभाषण मर्यादित ठेवावे. २) एखादी व्यक्ती संशयित वाटल्यास त्यास तत्काळ ब्लॉक करावे. ३) अशा प्रकारच्या सोशल माध्यमांवर संपर्कात आलेल्या व्यक्तीला भेटण्याआगोदार त्या व्यक्तीची चौकशी करावी. ४) फोनवर बोलून घ्यावे. तसेच, त्या व्यक्तीचा फोटो खरा आहे का, हे गुगलवर चेक करून घ्यावे.
हेही वाचा- राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, दिशा कायद्याचे काय झाले?