मुंबई : इंटरनॅशनल हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्विस लिमीटेड कंपनी व तिचे भागिदारांनी कंपनीची नोंदणी करताना बोगस कागद पत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेतन शेवळे यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सोमय्या यांनी उल्लेंगला हा सुजीत पाटकर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण : कोरोना काळात वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रकरणात ईडीने काही वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे. सोमवारपासून कोरोना काळात झालेल्या खरेदीच्या चौकशीला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर पालिकेत कोरोना काळात ज्या स्वरुपाचे टेंडरिंग झाले त्यात काही विशिष्ट कंपन्यांना टेंडर देण्यात आल्याचा आरोप आहे. या विशिष्ट कंपन्यांकडूनच वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली होती. या संपूर्ण खरेदीची चौकशी ईडीमार्फत सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे इंटरनल हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्विस लिमीटेड कंपनी व तिचे भागिदारांनी कंपनीची नोंदणी करताना वकिलाची स्वाक्षरी, नाव आणि पत्ता अशी बनावट माहिती दिल्याची तक्रार मरिन ड्राईव्ह पोलिसांना प्राप्त झाली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचे भागिदार संदीप गुप्ता व योगेश उल्लेंगला यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल : याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 465,468,471,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन शेळके यांनी याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १९ जानेवारी २०२१ ते २८ जानेवारी २०२२ दरम्यान हा गुन्हा घडला असून याबाबत १३ जानेवारी २०२३ ला गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी संदिप हरिशंकर गुप्ता आणि योगेश भूमेश्वरराव उल्लेंगला हे आरोपी आहेत.
किरीट सोमय्यांचा आरोप : कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची तक्रार सातत्याने विरोधी पक्षाकडून केली जात होती. पण कोरोना काळातील खरेदीला चौकशीच्या फेऱ्यात आणता येणार नाही, असे मुंबई मनपाने सांगितले होते. कोरोना काळात मुंबई पालिकेत वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. लाईफ लाईन मॅनेजमेंट प्रकरणातील हे प्रकरण आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळीकतेचा वापर करुन अस्तित्वात नसलेल्या संजय फाटकर यांच्या कंपनीला जम्बो कोव्हीड सेंटर चालविण्यासाठी करार केला होता. त्यांनी दिलेली कागदपत्रे बोगस होती का? हे चौकशीअंती समोर येणार आहे.
बीएमसीचे इतर घोटाळेसुद्धा चर्चेत : मुंबई महापालिका इतर प्रकरणातील घोटाळ्यांमुळेसुद्धा बदनाम झाली आहे. 2022 मध्ये मुंबईमधील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांत ९३८० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. यावर राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आली होती. यानंतर तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात होता.