मुंबई- प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात कोरोना संक्रमित रुग्णांकडून अवाजवी बील आकारण्याच्या संदर्भात मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्ये रुग्णालयाच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या काही रुग्णांना पीपीई किट, औषध , बेड चार्जेस च्या स्वरूपात लाखो रुपयांचे बील देण्यात आले होते. हा प्रकार सतत घडत असल्यामुळे या संदर्भात महानगर पालिकेच्या स्थानिक वॉर्डात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी तत्कालिन मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना लेखी तक्रार सुद्धा केली होती. या नंतर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केली. यानंतर 1 जुलैला पालिकेच्या के वॉर्डातील आसिस्टंट ऑडिटर रामचंद्र कोब्रेकर यांच्याकडून रुग्णालयाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार रुग्णालयाचे विश्वस्त , व संचालकांच्या विरोधात असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
नानावटी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत जवळपास 1100 रुग्णांवर या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी 150 बेड आरक्षित करण्यात आलेले आहेत. यामध्ये 42 बेड आयसीयू विभागात ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान , नानावटी रुग्णालयाच्या विरुध्द तक्रार दाखल झाल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळत आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची प्रत मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. ती प्राप्त झाल्यावर या बद्दल अधिक सांगता येईल, असे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून या संदर्भात सांगण्यात आले आहे.