मुंबई - सध्या देशामध्ये बेकारीचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र, सरकारी नोकरीचे आकर्षण कायमच सर्वांना भुरळ पाडते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काही लोक अवैध मार्गाचाही वापर करतात. या अवैध मार्गात मात्र नोकरीच्या आशेने उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांची लाखो रुपयांची फसवणूक होताना दिसत आहे. अशाचा प्रकारे लाखो रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार घाटकोपरमध्ये समोर आला आहे.
घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 22 फेब्रुवारी) रात्री नरसिम्हा चिंनपा लिखी (वय 50 वर्षे, रा. माहीम) यांनी रहिवाशी भूपेंद्र रावल ( वय 65 वर्षे), कुणाल रावल व ट्विंकल रावल (तिघे रा.घाटकोपर) यांच्या विरोधात रेल्वेत नोकरी लावतो म्हणून लाखो रुपये उकळ्याची तक्रार दिली. यानुसार पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नरसिम्हा चिंनपा लिखी हे मुंबईतील बांद्रा परिसरात इंटेरिअर डिझायनिंगचे काम करत होते. त्यांच्या संपर्कात नरसू पाटील आले व ते चार वर्षांपासून त्यांच्याकडे इंटेरिअरचे काम करत होते. नरसू पाटील यांनी बांद्रा रेल्वे टर्मिनस येथे सिटीएस मॅनेजमेंट कंपनीमध्ये कंत्राटी काम करत असलेल्या भूपेंद्र रावल यांची ओळख असल्याचे व रेल्वेमध्ये कायमची नोकरी लावून देत असल्याचे तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर ऑगस्ट, 2017 मध्ये तक्रारदाराला नीलकंठ धारा गारुडीया नगर, घाटकोपर येथील घरी रावल कुटुंबाने बोलावले. भूपेंद्र यांनी लिखींची ओळख त्यांचा मुलगा व मुलीशी करून दिली. ते रेल्वेमध्ये नोकर भरतीचे फॉर्म भरणे व नोकर भरती करत असल्याचे हे काम करत असल्याची माहिती भूपेंद्र रावल यांनी लिखी यांना दिली. यानंतर भूपेंद्रा रावल याने 2014 सालचे रेल्वेतील विविध पदाच्या नोकर भरतीचा बॅकलॉग पडून आहे आणि तो भरून काढण्यासाठी आम्ही तुमचे काम करून देऊ, असे त्यांना सांगितले. या कामासाठी एका उमेदवाराचे 8 लाख रुपये लागतील, असे सांगितले. यानंतर काही युवकांनी त्यांना लाखो रुपयेही दिले.
त्यानंतर भूपेंद्र रावल यांनी ज्या युवकांकडून आठ-आठ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली त्यांना रेल्वेचे भरतीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, रेल्वेचे ड्रेस व इतर साहित्य दिले. उमेदवार हे सर्व प्रमाणपत्र व साहित्य घेऊन शहानिशा करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठांना ज्यावेळेस भेटले त्या वेळेस त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तेव्हापासून रावल कुटुंब हे बेपत्ताच असायचे. पैसे आज देतो, उद्या पैसे देतो, काम होईल, असे वेगवेगळे कारणे देऊन लपून बसले होते. मात्र, काल सायंकाळी मुख्य सूत्रधार भूपेंद्र रावल यांस तक्रारदाराने पकडून पंतनगर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या नोकरीच्या आमिषाला बळी पडून काही युवकांनी आपले घरदार विकून पैसे भरले होते. सध्या या प्रकरणाचा पंतनगर पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा - मुंबईतील जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळ जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी वाया