मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या महत्वांच्या नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदिंची उपस्थिती होती. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्या नंतर झालेल्या या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपला यश आले. त्या नंतर भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे.
गोव्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला यश मिळाल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निकालांचा महाराष्ट्रावर होणारे परिणाम स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकांवर निकालांचा होणार परिणाम. केंद्रीय तपास यंत्रणाचा महाराष्ट्रात वाढणारा वावर, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची वाढत असलेली मागणी. ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवड, भाजपकडून सरकार अस्थिर करण्यासाठी होउ शकणारे प्रयत्न, राज्यपालांनी निवडणूक सुधारणा कायद्यावर सह्या केल्यामुळे निवडणुका तीन-चार महिने पुढे ढकलता येणे शक्य आहे. त्यादरम्यान ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा जमा करता येईल का असे अनेक प्रश्न सध्या राज्या समोर आहेत. या बैठकीत या मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते. एकुणच घडामोडी पाहता महाविकास आघाडीने मात्र सावध पवित्रा घेत पुढचे धोरण ठरवले आहे.