मुंबई : Car Operate On Fingers : आपल्याला कुठलीही कार चालवायची असेल तर आधी कारचा दरवाजा उघडून आत बसावं लागतं. त्यानंतर स्टेरिंगला हात लावल्याशिवाय कार चालू होत नाही. मात्र आयआयटी मुंबईच्या एका २१ वर्षीय संशोधकानं एक भन्नाट तंत्रज्ञान विकसित केलंय. या तंत्रज्ञानाद्वारे चक्क बोटांनी इशारे करून कार चालू करता येते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.
लहाणपणापासून वेगवेगळे संशोधन करण्याचा छंद : 'मेहुल बोराड' असे या आयआयटी मुंबईतील तरुण संशोधकाचं नाव. त्याला लहाणपणापासूनच वेगवेगळे संशोधन करण्याचा छंद आहे. आता त्यानं असं तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्याद्वारे स्टेअरिंगला हात न लावता कारला लांबूनच इशारे केले की ती कार व्यवस्थित पळू लागते. सध्या यासंबंधी त्याचे अनेक प्रयोग सुरू आहेत. यामध्ये त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचाही वापर केलाय.
भंगारातल्या यंत्रापासून आधुनिक तंत्रापर्यंत : मेहुल बोराड हा मूळचा राजस्थानचा. तो हैदराबादला शिकायला होता. त्यानंतर त्याने आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासून त्याला घरातील भंगारात टाकलेले यंत्र खेळण्याचा छंद होता. तेव्हापासूनच त्याचं यंत्रांवर प्रेम जडलं. त्यानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षाही दिली आहे. यंत्रांवरील या प्रेमापोटी त्यानं आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात : आयआयटीमध्ये दाखल होईपर्यंत मेहुलनं छोटं ड्रोन मशीन, ईव्ही कारचं रिमॉडेलिंग तसेच स्वतःचा एक रोबोट देखील बनवला होता. त्याचा तो रोबोट चक्क शाळेमध्ये नाचायचा. तसेच जमिनीवर कोणतेही अडथळे आले तरी ते अडथळे पार करणारी छोटी कार देखील त्याने तयार केली होती. विशेष म्हणजे, मेहुलच्या पालकांनी लाहानपणापासूनच त्याचं भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्सवरील प्रेम ओळखून त्याला यासाठी प्रोत्साहन दिलं.
लहानपणापासून घरच्यांनी प्रोत्साहन दिलं : इतक्या कमी वयात हे कसं जमलं, यावर मेहुल म्हणतो की, 'मी लहान असताना मला कोणत्याही मशीनच आकर्षण असायचं. ते कसं काम करतं? त्याच्यामध्ये कोणती यंत्रणा आहे? त्याची प्रणाली कोणती आहे? हे पाहण्याचा छंद मला जडला. एकदा मी दुसऱ्या वर्गात असताना एक छोटी मोटार, पेपर ब्लेड्स आणि काही बॅटऱ्या घेऊन त्यातून एक छोटा पंखा तयार केला. तेव्हापासून घरच्यांनी पण मला अशा यंत्रांच्या सोबत काम करण्याचं प्रोत्साहन दिलं', असं मेहुलनं सांगितलं.
शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न आहे : मेहुलचं स्वप्न शास्त्रज्ञ होण्याचं आहे. त्याची आयआयटीमधील हॉस्टेलची खोली तर अक्षरश: भंगारानं सजलेली आहे. त्याचं अजून एक स्वप्न आहे, ते म्हणजे, भारतात लाखो रुपयांच्या महागड्या वैद्यकीय चाचण्या केवळ काही रुपयांत झाल्या पाहिजे. आर्टिफिशल इंटेलिजन्सनं हे शक्य असल्याचं मेहुल सांगतो.
हेही वाचा :