मुंबई - केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर 8 ऑगस्टला धावपट्टी वरून विमान घसरून दुर्घटना घडली होती. या विमानात 190 प्रवासही होते. त्यांना वाचवताना विमानाचे कॅप्टन मराठमोळे दीपक साठे यांना आपला प्राण गमवावा लागला. साठे यांनी विमान वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण त्यात यश येऊ शकले नाही. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) विक्रोळीतील हिंदू स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यु झाला आहे.
महाराष्ट्राचे सुपूत्र दीपक साठे -
दीपक साठे हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्यांनी या अगोदर भारतीय हवाई दलात उत्तम कामगिरी केली आहे. मराठमोळे दीपक साठे हे एक जिगरबाज पायलट म्हणून ओळखले जात होते. ते मुंबईतील चांदिवली येथील रहिवासी होते. त्यांचे वडील भारतीय सैन्यात ब्रिगेडियर होते. तर त्यांचे मोठे भाऊ यांना कारगील युद्धात वीरमरण आले होते. दीपक साठे यांनीही भारतीय वायुदलात कर्तृत्व गाजवले आहे. एकूणच साठे कुटुंबाने आपले आयुष्य देशसेवेसाठीच वेचले.
दीपक वसंत साठे हे १९८१ साली हवाईदलात वैमानिक म्हणून रुजू झाले. त्याआधी त्यांनी पुण्याच्या एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. २००३ पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले. सुरुवातीला अनेक वर्षे त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे ‘एअरबस ३१०’ हे विमान उडवले. त्यानंतर अलिकडेच ते बोइंग विमानावर स्थलांतरित झाले होते. एक कुशल लढाऊ वैमानिक अशी त्यांची ओळख होती. त्यांना प्रचंड मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर वायुसेनेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' (मानाची तलवार) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच प्रेसिडेंट गोल्ड मेडेल अर्थात राष्ट्रपती सुवर्ण पदकानेही गौरवण्यात आले होते.
दीपक साठे हे हवाईदल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर राहिले होते. राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची मानाची तलवार त्यावेळी त्यांनी जिंकली होती. २२ वर्षांच्या हवाईदलातील सेवेत ते हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) चाचणी वैमानिक अर्थात टेस्ट पायलटदेखील राहिले होते. त्यांच्यामागे पत्नी सुषमा, शंतनू आणि धनंजय यांच्यासह सुना असा मोठा आप्त परिवार आहे. अशा या लढवय्या व्यक्तिमत्त्वास 'ईटीव्ही भारत'ची भारतची श्रद्धांजली!